Men’s Junior Asia Cup 2024 : हॉकी इंडियाने पटकावले पाचव्यांदा विजेतेपद, Final मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानला लोळवलं…

Men’s Junior Asia Cup 2024 (IND vs PAK Final) : पुरुष ज्युनियर आशिया चषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5-3 ने पराभव केला आहे. टीम इंडिया हॉकी स्पर्धेत पुन्हा एकदा चॅम्पियन बनली आहे. भारतासाठी अरिजित सिंगने दमदार कामगिरी करत चार गोल केले. टीम इंडियासाठी दिलराज सिंगने गोल केला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस दोन्ही संघ बरोबरीवर होते. पण नंतर भारतानं बाजी मारली.
🏆 INDIA CLINCHES THE MEN’S JUNIOR ASIA CUP 2024! 🇮🇳🔥
Team India reigns supreme, defeating Pakistan 5-3 in a thrilling final to lift the championship trophy! 🥇
Unbeaten throughout the tournament, these young champions have shown the world what they’re made of! 💪🔥Kudos to… pic.twitter.com/EOc5I7Jz1o
— Hockey India (@TheHockeyIndia) December 4, 2024
या सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानने केला. त्याच्यासाठी हनान शाहितने पहिल्या क्वार्टरच्या तिसऱ्याच मिनिटाला गोल केला होता. मात्र यानंतर लगेचच भारताने पुनरागमन केले. टीम इंडियासाठी अरिजित सिंगने पेनल्टी कॉर्नरचे यशस्वी रूपांतर करत चौथ्या मिनिटाला गोल केला. अशाप्रकारे पहिल्या क्वार्टरअखेर दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते.
टीम इंडियाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये आघाडी घेतली. अरिजितने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नर यशस्वी करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये आणखी एक गोल केला. संघासाठी 19व्या मिनिटाला दिलराज सिंगने गोल केला. यानंतर पाकिस्तानकडून एक गोल करण्यात आला. सुफियान खानने 30व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये यशस्वी रूपांतर केले. दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारत 3-2 ने पुढे होता.
तिसरा क्वार्टर पाकिस्तानसाठी चांगला होता. सुफियानने 39व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरला यश मिळवून दिले. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारत आणि पाकिस्तानचे संघ 3-3 असे बरोबरीत होते. पण भारताने चौथ्या क्वार्टरमध्ये पुनरागमन करत सामना जिंकला. अरिजीतने 47व्या मिनिटाला टीम इंडियासाठी मैदानी गोल केला. यानंतर त्यानेच 54व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताची आघाडी मजबूत केली. अशाप्रकारे टीम इंडियाने पाकिस्तानचा 5-3 ने धुव्वा उडवत शानदार विजय साकारला.
पाचवे विजेतेपद….
भारताचे हे पाचवे विजेतेपद ठरले. याआधी भारतीय संघाने चार वेळा (2004, 2008, 2015, 2023) विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे ज्युनियर आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ राहिलेला आहे.





