IND vs ZIM : संजू-अभिषेकने केला रेकॉर्ड! इतर ओपनर्सना या वर्ल्ड कपमध्ये जे जमलं नव्हतं ते करून दाखवलं
IND vs ZIM : संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने ४८ धावांची सलामी देत या स्पर्धेतील भारताची सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशिप नोंदवली आहे.

IND vs ZIM Sanju Samson Abhishek Sharma opening partnership : टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीबाबत असलेली चिंता अखेर मिटली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने ४८ धावांची सलामी देत या स्पर्धेतील भारताची सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशिप नोंदवली आहे. या पार्टनरशिपमुळे भारताला पॉवरप्लेमध्ये दमदार सुरुवात मिळाली.
२७ वी धाव काढताच रचला ‘इतिहास’ –
स्पर्धेतील मागील ५ सामन्यांमध्ये भारतीय सलामीवीर मोठी धावसंख्या उभारण्यात सातत्याने अपयशी ठरत होते. मात्र, या सामन्यात संजू आणि अभिषेकने केवळ २७ धावा जोडताच या वर्ल्ड कपमधील भारताच्या आतापर्यंतच्या सर्व सलामीच्या भागीदाऱ्यांचा विक्रम मोडला. हे आकडे हेदेखील स्पष्ट करतात की, या स्पर्धेत भारताची सलामीची जोडी किती मोठ्या धावसंख्येसाठी संघर्ष करत होती.
संजू-अभिषेकच्या पार्टनरशिपने भारताची दमदार सुरुवात –
अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी केवळ २३ चेंडूंमध्ये ४८ धावांची आक्रमक भागीदारी केली. अभिषेक शर्माने ८ चेंडूत १७ धावांचे योगदान दिले. तसेच संजू सॅमसन १५ चेंडूत २४ (२ षचकार, १ चौकार) धावा केल्यानंतर बाद झाला, ज्यामुळे ही जोडी फुटली. झिम्बाब्वेच्या मुजरबानीने संजूला झेलबाद करत धावसंख्येला ब्रेक लावण्याचे काम केले.
गेल्या ५ सामन्यांतील अपयशावर मारली फुली –
याआधी खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांमध्ये भारताची सलामीची जोडी कधीही ४८ धावांपर्यंत पोहोचू शकली नव्हती. संजू आणि अभिषेकच्या या खेळीमुळे मधल्या फळीवरील दबाव कमी झाला आणि भारताला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी आवश्यक असलेला पाया रचता आला.






