नवी दिल्ली – अमेरिकेने चीन, व्हिएतनाम आणि कंबोडिया या देशाविरोधात मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावले आहे. अशा परिस्थितीत भारत आणि अमेरिकेदरम्यानचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढण्यास संधी निर्माण झाली आहे. भारत -अमेरिका व्यापार करारात भारताला अनेक संधी निर्माण होऊ शकतात, असे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनागडिया यांनी सांगितले. चीनमध्ये तयार होणार्या वस्तूची अमेरिकेला निर्यात केली जाते. त्याचबरोबर चीनमधील बर्याच वस्तू व्हिएतनाम आणि कंबोडियामार्गे अमेरिकेला जातात. अशा परिस्थितीत चीन, व्हिएतनाम व कंबोडिया विरोधात अमेरिकेने जास्त आयात शुल्क लावले आहे. याचा थेट फायदा भारताच्या निर्यातदारांना होऊ शकतो. मात्र भारतीय निर्यातदारांनी दर्जेदार उत्पादने तयार करून कार्यक्षमरीत्या ती अमेरिकेला पाठविण्यासाठी काम करण्याची गरज आहे. चीन व अमेरिकेदरम्यानचे मतभेद व्यापाराच्या पलीकडेही आहेत. अशा परिस्थितीत अमेरिका चीनला एकटा पाडण्याचा प्रयत्न करत आहे. असे असतानाच पर्याय म्हणून अमेरिका भारतासारख्या देशांना तयार करीत आहे. सुदैवाने भारत सरकारने अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा करार एक महिन्यात होण्याची शक्यता आहे. याबरोबरच चीन विरोधातील इतर युरोपियन देश भारताबरोबर व्यापार करार करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही भारताच्या दृष्टिकोनातून जमेची बाजू असल्याचे त्यांनी सांगितले.