India Fuel Stock Update: मध्य-पूर्वेतील (मिडल ईस्ट) वाढत्या युद्धजन्य तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात चिंतेचे वातावरण असतानाच, भारत सरकारने देशातील इंधन पुरवठ्याबाबत मोठी आणि दिलासादायक माहिती दिली आहे. भारताकडे पुढील ६० दिवसांचा कच्चा तेल साठा आणि एक महिन्याचा एलपीजी (LPG) पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. इंधन साठ्याची सद्यस्थिती- पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताची एकूण साठवणूक क्षमता ७४ दिवसांची आहे. सद्यस्थितीत देशाकडे साधारण ६० दिवसांचा कच्चा तेल, पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे. पुढील दोन महिन्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या तेलाची खरेदी प्रक्रिया आधीच पूर्ण करण्यात आली आहे. जागतिक परिस्थिती कशीही असली तरी देशांतर्गत पुरवठा खंडित होणार नाही, याची ग्वाही सरकारने दिली आहे. ४१ देशांमधून आयात; रिफायनरी पूर्ण क्षमतेने सुरू – होर्मुज सामुद्रधुनीतील तणावामुळे पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, भारताने आता आपला आयातीचा स्रोत विस्तारला असून, देश ४१ पेक्षा जास्त देशांकडून कच्चा तेल आयात करत आहे. सध्या देशातील सर्व रिफायनरी १०० टक्के क्षमतेने कार्यरत असून मागणीनुसार उत्पादन सुरू आहे. हेही वाचा – मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्यांत फक्त इतक्या रुपयांचं मिळणार पेट्रोल-डिझेल; प्रशासनाचा मोठा निर्णय LPG पुरवठा आणि वितरणाचे नियोजन – घरगुती गॅसबाबत सरकारने महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवून दररोज ५० हजार मेट्रिक टन करण्यात आले आहे. दररोज ५० लाखांहून अधिक सिलेंडर्सची डिलिव्हरी केली जात आहे. कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा ५० टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे, जेणेकरून काळाबाजारीला आळा बसेल. किमान एक महिन्याचा एलपीजी साठा पूर्णपणे सुरक्षित आहे. “काही भागात पेट्रोल-डीझेल खरेदीसाठी होणारी गर्दी ही केवळ सोशल मीडियावरील अफवांमुळे आहे. देशात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही. नागरिकांनी घाबरून जाऊन साठा करू नये.” अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने दिली आहे. PNG पर्यायावर भर – सरकारने पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) हा स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय असल्याचे सांगत त्याच्या विस्तारावर जोर दिला आहे. मात्र, हा विस्तार एलपीजीच्या कमतरतेमुळे नसून, एक उत्तम पर्याय म्हणून केला जात असल्याचे सरकारने स्पष्ट केले. नागरिकांनी केवळ अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा. पेट्रोल पंपांना दिला जाणारा क्रेडिट कालावधीही तीन दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे पुरवठा साखळी अधिक मजबूत झाली आहे.