India FTA: भारताचा 22 देशांबरोबर मुक्त व्यापार करार – मंत्री पियुष गोयल
India FTA: ही मोहीम आगामी काळातही चालू राहणार आहे, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

India FTA: विविध देशादरम्यान संघर्ष सुरू झाल्यानंतर आणि अमेरिकेने एकतर्फी व्यापार युद्ध सुरू केल्यानंतर भारताने विविध देशाबरोबर मुक्त व्यापार करार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
त्यामुळे भारताने आतापर्यंत तब्बल 22 देशाबरोबर मुक्त व्यापार करार केला आहे. ही मोहीम आगामी काळातही चालू राहणार आहे, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
भारत – युरोपीय समुदाय मुक्त व्यापार करार एक अभूतपूर्व करार आहे. तब्बल वीस वर्ष चर्चा केल्यानंतर हा करार फलद्रुप झाला आहे. विशेष म्हणजे आता चर्चा संपली असली तरी काही महिन्यातच व्यापार करणार्याच्या मसुद्यावर चर्चा होईल आणि डिसेंबरपूर्वीच या व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू होईल असे गोयल यांनी स्पष्ट केले.
या करारानंतर भारतातील 93% वस्तूंना युरोपमध्ये शून्य टक्के आयात शुल्क लावले जाणार आहे. भारताने हा करार करताना देशातील शेतकर्यांच्या हिताची काळजी घेतली असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. हा करार इतका व्यापक आहे की यामुळे 200 कोटी ग्राहक परस्परांशी जोडले जाणार आहेत.
भारत आणि युरोपाचे एकत्रित उत्पन्न जागतिक उत्पन्नाच्या 25% आहे. एकूण जागतिक व्यापाराच्या म्हणजे 33 लाख कोटी डॉलरच्या तुलनेत या दोन्ही देशादरम्यानचा व्यापार 11 लाख कोटी डॉलरच्या दरम्यान होणार आहे.





