विश्रांतीचा कालावधी चुका कमी करण्यासाठी उपयुक्त – उमेश

कुलिज, (अँटिग्वा) – आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून दूर राहण्याच्या कालावधीत मी माझ्या खेळातील चुका कमी करण्यावर खर्च केला. त्यामुळे सामन्यांपासून दूर राहिल्याची खंत मला वाटली नाही असे भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने सांगितले.

उमेशने फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात भाग घेतला होता. त्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली नव्हती. त्याने येथे वेस्ट इंडिज “अ’ संघाविरूद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात 19 धावांमध्ये तीन गडी बाद करीत आपल्या गोलंदाजीत अजूनही चमकदार कामगिरी करण्याची क्षमता आहे हे दाखवून दिले आहे.

तो म्हणाला की, द्रुतगती गोलंदाज या भूमिकेत काम करताना मला सतत टप्पा, दिशा व लय ठेवण्यासाठी भरपूर सराव करावा लागतो. मधल्या काळात स्थानिक सामने व आयपीएलमध्ये मी भाग घेतला. त्याचाही मला चुका सुधारण्यासाठी व शारीरिक तंदुरूस्ती आजमावण्यासाठी झाला. विदर्भ क्रिकेट अकादमीत सुब्रतो बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली मी सराव केला. अन्य वेगवान गोलंदाजांप्रमाणेच मला चेंडूच्या टप्प्याबाबत काही समस्या होत्या. त्याचे निराकरण करण्यासाठी मला बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मी माझ्या शैलीत थोडासा बदल केला.

विदर्भाकडून रणजी सामन्यांमध्ये खेळण्याची मला संधी मिळाली. या संघास रणजी करंडक जिंकून देण्यात मी खारीचा वाटा उचलला. हे विजेतेपद माझ्यासाठी संस्मरणीय आहे. रणजी स्पर्धा ही स्थानिक स्तरावरील प्रतिष्ठेची स्पर्धा असते. ही स्पर्धा म्हणजे भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी असलेले प्रवेशद्वारच मानले जाते. या विजेतेपदामुळे भारताच्या कसोटी संघात स्थान मिळविण्याचा माझा आत्मविश्‍वास वाढला. पाठोपाठ आयपीएलमध्ये बंगळुरू संघाकडून खेळताना या संघामधील अन्य ज्येष्ठ खेळाडूंकडूनही मला मौलिक सूचना मिळाल्या. त्यामुळेच माझ्या गोलंदाजीत सुधारणा होण्यास मदत झाली आहे असे उमेशने सांगितले.

भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांच्या स्थानासाठी चुरस वाढली आहे काय असे विचारले असता उमेश म्हणाला की, स्पर्धा वाढली हे चांगले लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपला दर्जा उंचावण्यासाठी व खेळातील चुका कमी करण्यासाठी धडपड करतो, त्यामुळे संघातील गोलंदाजांची गुणवत्ता वाढण्यासाठीही अप्रत्यक्षरित्या मदत होते. प्रत्येक गोलंदाज संघात स्थान मिळविण्यासाठी व ते स्थान टिकविण्यासाठी सकारात्मक वृत्तीने आव्हानास सामोरे जात असतो. येथील खेळपट्ट्या व वातावरण द्रुतगती गोलंदाजांसाठी पोषक असल्यामुळे मी त्याचा आनंद घेणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)