जमैकाच्या विकास यात्रेत भारत विश्वासू भागीदार; पंतप्रधान मोदी यांची जमैकाच्या पंतप्रधानांशी केली चर्चा

नवी दिल्ली : जमैकाच्या विकासाच्या यात्रेमध्ये भारत हा विश्वासू भागीदार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सार्वजनिक डिजीटल पायाभूत सुविधा, जैवइंधन, नवोन्मेष आणि आरोग्यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधील तज्ज्ञांचे अनुभव जमैकाला देण्यास भारत तयार आहे, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. भारत दौऱ्यावर आलेले जमैकाचे पंतप्रधान ऍन्ड्र्यू होलनेस यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली आणि द्विपक्षीय चर्चा केली. याप्रसंगी ते बोलत होते.
जमैकाच्या पंतप्रधानांशी आपण प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. सर्व वाद आणि तणाव चर्चेच्या माध्यमातून मिटवले जाऊ शकतात, यावर दोघांचेही एकमत झाले. तसेच जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी एकत्र काम करणार आहोत, असेही पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांना सांगितले.संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेसह जागतिक पातळीवरील सर्व संस्थांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे, यावरही भारत आणि जमैकाचे एकमत झाले आहे.
इतर अनेक क्षेत्रांमधील सहकार्यासह संरक्षण क्षेत्रातील सहकार्यामध्ये जमैकाच्या सुरक्षा दलांना प्रशिक्षण क्षमतावाढीसाठी भारत मदत करणार असल्याचे मोदी म्हणाले. सामूहिक गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, दहशतवाद ही दोन्ही देशांसमोरील समान आव्हाने आहेत. भारत आणि जमैकामधील संबंध समायिक इतिहास, लोकसाही मूल्ये आणि नागरिकांमधील थेट संवादावर आधारलेले आहेत, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले. होलनेस यांचे सोमवारी येथे आगमन झाले. जमैकाच्या पंतप्रधानांची ही पहिलीच द्विपक्षीय भारत भेट आहे.





