कॅनडाच्या निवडणुकांमध्ये भारताचा हस्तक्षेप नाही

नवी दिल्ली – कॅनडातील निवडणुकांमध्ये भारताकडून हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप भारताने सपशेल फेटाळून लावला आहे. या उलट कॅनडाकडूनच भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याचे प्रत्युत्तर भारताच्यावतीने कॅनडाला देण्यात आले आहे.
कॅनडामधील गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारताने केलेल्या हस्तक्षेपाच्या आरोपांची तपासणी करण्याचा विचार कॅनडातील फेडरल कमिशन करत असल्याचे वृत्त कॅनडामधील माध्यमांनी दिले आहे. त्यावर भारताच्यावतीने हे स्पष्टिकरण देण्यात आले आहे.
हे आरोप बिनबुडाचे असून भारताकडून कधीही कॅनडातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला गेला नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे.
कॅनडाच्या फेडरल कमिशनच्या तपासणीचा मुख्य हेतू प्रामुख्याने चीन, रशिया आणि अन्य परदेशामधून कॅनडातील निवडणुकांमध्ये होत असलेल्या हस्तक्षेपाच्या आरोपांची तपासणी करणे हा आहे.
अन्य कोणत्याही देशाच्या लोकतांत्रिक प्रक्रीयेमध्ये हस्तक्षेप करण्याचे भारताचे धोरण नाही. हा मुद्दा भारताकडून कॅनडाकडे वारंवार उपस्थित केला जातो आहे.
भारताच्या अंतर्गत व्यवहारामध्ये कॅनडाकडून होत असलेल्या हस्तक्षेपाची दखल घेण्यात यावी, असे भारताच्यावतीने कॅनडालाच सांगितले जात आहे, असे जयस्वाल म्हणाले.
एकापाठोपाठ एक आरोप
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. कॅनडामध्ये हत्या झालेला खलिस्तानी निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
त्यानंतर दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकारी पातळीवर आरोप प्रत्यारोप झाले होते. या आरोपांनंतर भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्यांची देशातून हकालपट्टी केली होती.





