लिस्बन (पोर्तुगाल) : भारताला देश जिंकायचे नाहीत, तर मने जिंकायची आहेत, असे प्रतिपादन पोर्तुगालच्या दौऱ्यावर गेलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. पोर्तुगालमधील चंपालीमॉड सेंटर फॉर द अननोनमध्ये भारतीय संशोधकांशी राष्ट्रपतींनी वार्तालाप केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. पोर्तुगालमधील भारतीय संशोधकांची ओळख भारताच्या नावावरून केली जाते. म्हणून त्यांनी भारताचे सर्वोत्तम राजदूत बनावे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केले. तम्ही शिक्षणात वरचढ ठरा, संशोधनात वरचढ ठराल. तुम्ही चांगले विद्वान बनाल. मात्र तुम्ही पोर्तुगालच्या अर्थकारणात, समाजात योगदान देणार आहात. पोर्तुगालमधील नियम आणि नियमनांचे पालन कराल. त्यामुळेच देशाला तुमच्याबद्दल अभिमान वाटेल, असेही त्या म्हणाल्या. शिक्षिकेच्या स्वभावाला अनुसरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संशोधकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. भारतीय महिलांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रपतींनी महिलांना भारतात किती आदराचे स्थान आहे, हे सांगितले. भारतात सीता-राम, लक्ष्मी -नारायण असे संबोधण्याची प्रथा आहे. भारतात विविध क्षेत्रांमध्ये महिलांची प्रगती बघून आपल्याला अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले. चंपालीमॉड सेंटर फॉर द अननोनच्या कॅम्पसमध्ये कॅमेलिया जॅपोनिकाचे झाड देखील राष्ट्रपती मुर्मू यांनी लावले. आदल्या दिवशी, राष्ट्रपतींनी पोर्तुगालच्या संसदेला भेट दिली. तिथे त्यांनी असेंबलीया दा रिपब्लिकाचे अध्यक्ष डॉ. जोस पेड्रो अग्युआर-ब्रँको यांची भेट घेतली.