अरविंद केजरीवाल यांची सुटका करा; इंडिया आघाडीची दिल्लीत निदर्शने करत एकमुखी मागणी

नवी दिल्ली – पुन्हा एकजूट दर्शवत विरोधी पक्षांची इंडिया आघाडी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी उभी राहिली. केजरीवाल यांची सुटका करण्याची एकमुखी मागणी करत त्या आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात निदर्शने केली.
दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्यासंदर्भात केजरीवाल यांना अटक करण्यात आली.
ते सध्या तुरूंगात आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याचा दावा त्यांच्या पक्षाकडून (आप) केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, केजरीवाल यांच्या पाठिशी ठामपणे असल्याची ग्वाही देण्यासाठी इंडिया आघाडीने निदर्शने केली. त्यावेळी बोलताना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. राजकीय कारस्थानाचा भाग म्हणून केजरीवाल आणि विरोधी पक्षांच्या इतर नेत्यांना तुरूंगात धाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तर केंद्रात सत्तेत आल्यानंतर विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या यंत्रणांचे काम थांबवण्याचा इशारा दिला. आपच्या नेत्यांबरोबरच ज्येष्ठ नेते शरद पवार, कॉंग्रेसचे गौरव गोगोई आणि इतर पक्षांचे नेते निदर्शनांमध्ये सहभागी झाले. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता याही निदर्शनांवेळी उपस्थित होत्या.





