India Beat Nepal : भारताचा नेपाळवर १० गडी राखून एकतर्फी विजय; आर्यवीर-लक्ष्यची नाबाद अर्धशतकं, आशिया कपमध्ये विजयी सलामी
India Beat Nepal : अंडर-१९ पुरुष आशिया कप २०२६ मध्ये भारताने नेपाळला १० गडी राखून पराभूत केले. नेपाळला १२८ धावांवर सर्वबाद केल्यानंतर, भारताने १९.१ षटकांत एकही गडी न गमावता १२९ धावांचे लक्ष्य पूर्ण केले.

India U19 Beat Nepal U19 Asia Cup 2026 Aryaveer Sehwag Fifty : एसीसी मेन्स अंडर-१९ आशिया कप २०२६ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय युवा संघाने नेपाळचा १० गडी राखून धुव्वा उडवत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. अल अमरात क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात नेपाळने भारतासमोर विजयासाठी १२९ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीरांच्या तुफानी खेळीच्या जोरावर हे लक्ष्य एकही विकेट्स न गमावता अवघ्या १९.१ षटकांत सहज पार करत भारताने एकतर्फी विजय नोंदवला.
गोलंदाजांचे वादळ; नेपाळचा डाव १२८ धावांवर गारद –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या नेपाळ संघाची भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर दाणादाण उडाली. नेपाळचा संपूर्ण संघ ४२.३ षटकांत १२८ धावांवर गारद झाला. भारताकडून इशान सूदने अत्यंत शिस्तबद्ध मारा करत १० षटकांत १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या, तर अर्जुन राजपूतने ५.३ षटकांत अवघ्या ८ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना तंबूत धाडले. याशिवाय यशवीर गौदने २, तर मनाल चौहान आणि काव्या पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेत नेपाळचे कंबरडे मोडले.
आर्यवीर सेहवागचे वादळ; वडिलांसारखाच आक्रमक अंदाज
🚨 India U19 registered a dominant 10 wicket victory over Nepal U19. 🔥 https://t.co/KNp67qe0Hy
— HIMANI 🐥 (@himanii_68) November 6, 2026
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा माजी दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग याने वडिलांच्याच आक्रमक शैलीची पुनरावृत्ती केली. मैदानात उतरल्यापासून नेपाळच्या गोलंदाजांवर तुटून पडत त्याने अवघ्या ५२ चेंडूंत ७ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांसह नाबाद ७० धावांची वादळी खेळी साकारली. आर्यवीरच्या या फटकेबाजीमुळे नेपाळचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले.
कर्णधार लक्ष्य रायचंदानीचे अर्धशतक; १९.१ षटकांतच सामना खल्लास
𝐈𝐬𝐡𝐚𝐧 𝐰𝐚𝐬 𝐛𝐫𝐞𝐚𝐭𝐡𝐢𝐧𝐠 🔥 𝐢𝐧 𝐡𝐢𝐬 𝐨𝐩𝐞𝐧𝐢𝐧𝐠 𝐬𝐩𝐞𝐥𝐥 👀
#DPWorldMensU19AsiaCup2026 #INDvNEP #ACC https://t.co/QXn5a75Xrx
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) November 6, 2026
दुसऱ्या बाजूने कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानी यानेही सुरेख फलंदाजी करत ६४ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावा ठोकल्या. या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या गड्यासाठी नाबाद १२९ धावांची शतकी भागीदारी रचून भारताला दिमाखदार विजय मिळवून दिला. १९.१ षटकांत १० गडी राखून मिळवलेल्या या मोठ्या विजयासह भारताने गुणतालिकेत आघाडी घेत प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला आहे.





