#AsiaCup2022 Super 4 Match : आणखी एक “सुपर संडे’; #INDvPAK आज पुन्हा एकदा आमने-सामने

शारजा – आशिया चषक 2022 मधील सुपर फोर फेरीत उद्या, रविवारी भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. साखळी फेरीत पाकिस्तानचा पराभव केल्याने भारतीय संघाचे मनोबल वाढलेले असून ही विजयी मालिका कायम राखण्यासाठी रोहित सेना मैदानात उतरणार आहे.
पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या सामन्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमधून वगळून रवींद्र जडेजाला चौथ्या क्रमांकावर बढती दिली होती. आता उद्या होणाऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि द्रविड पुन्हा कोणती खेळी करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच गेल्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या वन-मॅन शोने भारताला शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवून दिला होता. या सामन्यातही रोहितला त्याच्याकडू याच कामगिरीची अपेक्षा असेल. तथापि, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही पाकिस्तानी गोलंदाजांच्या आक्रमणापुढे अडखळत असल्याचे दिसून आल्याने त्यांच्या समस्या वाढल्या होत्या. यामुळे शीर्ष क्रमात बदल होण्याची शक्यता आहे.
सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुल दुखापतीनंतर पुन्हा भारतीय संघात परतला आहे. अजूनपर्यंत त्याने खास कामगिरी केली नसली तरी तो एक उत्तम दर्जाचा खेळाडू असल्याने त्याच्याकडून संघाला मोठी अपेक्षा आहे. याशिवाय हॉंगकॉंगविरुद्ध स्फोटक खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
दुसरीकडे पाकिस्तान संघाही पहिल्या 10 षटकांत अधिक धावा करण्यासाठी प्रयत्नशील असेल. यासाठी मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांना निर्णायक सुरुवात करावी लागेल. परंतु प्रथम फलंदाजी करणे या जोडीला अद्याप जमलेले नाही. यामुळे आवेश खान आणि अर्शदीप सिंग हे दोघेही प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होऊ शकतात. पाकिस्तानचा अनुभवी स्फोटक फलंदाज फखर जमानने हॉंगकॉंगविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले. अशा स्थितीत तो भारताविरुद्धच्या सामन्यात तो चांगली कामगिरी करु शकतो.
गोलंदाजीबाबत सांगायचे झाल्यास अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 4 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला हॉंगकॉंगविरुद्धही यश मिळाले. सुपर-4 सामन्यातही भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध आपल्या गोलंदाजीने छाप सोडू शकतो. तसेच लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेलकडूनही चांगल्या कामगिरीची आशा आहे. दरम्यान, युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी हा साईड स्ट्रेन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नसल्याने पाक संघाला आणखी एक धक्का बसला आहे.





