सरकार स्थापनेसाठी ताकदीची चाचपणी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ‘इंडिया’ आघाडीची बैठक सुरु

India Alliance Meeting Live: लोकसभा निवडणूक 2024 मधील शानदार कामगिरीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. बैठकीत निकालानंतरची रणनीती तयार केली जात आहे. या बैठकीसाठी इंडिया आघाडीचे नेते राजधानीत पोहोचले आहेत. यावेळी खरगे म्हणाले की, आमच्या युतीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. जे आर्थिक न्यायासाठी वचनबद्ध आहेत त्यांचे स्वागत आहे.
काँग्रेस अध्यक्षांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “मी इंडिया आघाडीच्या सर्व मित्रपक्षांचे स्वागत करतो. आपण एकत्र लढलो, समन्वयाने लढलो आणि पूर्ण ताकदीने लढलो. तुम्हा सर्वांचे अभिनंदन! 18व्या लोकसभा निवडणुकीचे जनमत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विरोधात आहे. निवडणुक त्यांच्या नावावर आणि चेहऱ्यावर लढवली गेली आणि जनतेने भाजपला बहुमत न देऊन त्यांच्या नेतृत्वाला स्पष्ट संदेश दिला आहे. वयक्तिक पातळीवर मोदीजींसाठी ही केवळ राजनैतिक हार नसून नैतिक हार देखील आहे. पण आपण त्यांचा स्वभाव जाणतो. मोदी हे जनमत नाकारण्याचा प्रयत्न करतील.”
ते म्हणाले, “भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेवर अतूट विश्वास असलेल्या आणि आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायाच्या उद्दिष्टांसाठी कटिबद्ध असलेल्या सर्व राजकीय पक्षांचे इंडिया आघाडी स्वागत करते, असा संदेशही आम्ही देतो.”
तत्पूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, सरकार स्थापनेचा दावा करण्यासह भविष्यातील रणनीतींवर युतीच्या बैठकीत चर्चा केली जाईल. ते म्हणाले की, काँग्रेस सर्व मित्रपक्षांचा आदर करते. राहुल गांधी यांनी वायनाड (केरळ) आणि रायबरेली (उत्तर प्रदेश) या दोन्ही लोकसभा जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत.
दरम्यान, दुसरीकडे नुकतीच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची बैठक पार पडली आहे. एनडीएतील सर्व पक्षांनी सरकार स्थापनेसाठी सहमती दर्शवली आहे. तसेच 8 जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे.





