‘त्या’ प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना खास कान मंत्र; काय म्हणाले? पाहा…
India Alliance Meeting | Election Commission | Sharad Pawar | Rahul Gandhi। लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नवीन अधिकृत निवासस्थान असलेल्या ५ सुनहरी बाग रोडवर इंडिया अलायन्सच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सुमारे २५ पक्षांमधील सुमारे ५० नेत्यांनी एकत्रितपणे निवडणूक हेराफेरी आणि एसआयआरला विरोध करण्याचे मान्य केले.
बैठकीत राहुल गांधी यांनी इंडिया अलायन्सच्या नेत्यांना निवडणूक हेराफेरीवर सादरीकरण दिले आणि निवडणूक आयोग आणि भाजपच्या संगनमताने निवडणुकीत मतांची चोरी कशी होत आहे हे स्पष्ट केले. या बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान अनेक निर्णयही घेण्यात आले.
या बैठकीत राहुल गांधी यांनी पुराव्यासह एक प्रेझेंटेशन दिले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राहुल गांधींना सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांनी जे प्रेझेंटेशन सादर केले, ‘ते देशभरात प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात दाखवले पाहिजे’ असा सल्ला शरद पवारांनी दिला.
याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “राहुल गांधी यांनी सविस्तरपणे आम्हाला प्रेझेंटेशन दाखवले. त्यावर खूप चांगली चर्चा बैठकीत झाली. शरद पवारांनी प्रत्येक राज्यात हे प्रेझेंटेशन द्यायला हवे. जिल्ह्यात, तालुक्यात हे व्हावे असा सल्ला दिला.
देशात जे कुणी सशक्त लोकशाहीवर विश्वास ठेवतात त्यांनाही हे प्रेझेंटेशन द्यावे. जे खरे आणि खोटे ते लोकांसमोर येईल. निवडणूक आयोग जर स्वायत्त संस्था असेल तर त्यांनी यावर उत्तर द्यायला हवे. ही सर्व माहिती आयोगाच्या वेबसाईटवरून घेतली आहे असं त्यांनी म्हटलं.
बैठकीत काय घडलं?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे की एसआयआरचा मुद्दा आता संसदेत आणि बाहेर अधिक जोमाने उपस्थित केला जाईल. हे केवळ बिहारपुरते मर्यादित राहणार नाही तर सर्व विरोधी पक्ष संपूर्ण देशात यासंदर्भात मोठी मोहीम राबवतील.
यासोबतच, राहुल गांधी यांनी मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या आरोपांशी संबंधित कागदपत्रे बाहेर काढल्यानंतर, आता सर्व पक्ष ही माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम करतील.





