रशियाकडून तेल आयात कमी करण्यास भारत तयार, पण ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ मोठी अट

Russian Crude Oil Imports: भारताने रशियाकडून तेल आयात कमी करण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु यासाठी अमेरिकेसमोर एक अट ठेवली आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतावर 25% अतिरिक्त आयात शुल्क लादले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये रशियाकडून तेल खरेदी हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारताने रशियाकडून तेल आयात कमी करण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु त्याबदल्यात अमेरिकेने इराण आणि व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीस परवानगी द्यावी, अशी अट घातली आहे. हे दोन्ही देश तेलाचे प्रमुख पुरवठादार आहेत, परंतु अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. या आठवड्यात अमेरिकेला भेट देणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाने अमेरिकी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत ही मागणी पुन्हा मांडली. भारतीय अधिकाऱ्यांनी असा युक्तिवाद केला की, जर भारताने रशिया, इराण आणि व्हेनेझुएला यांच्याकडून एकाच वेळी तेल खरेदी बंद केली, तर जागतिक तेलाच्या किमती वाढू शकतात. याबाबत वाणिज्य आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी तसेच नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रशियन तेल खरेदीचा मुद्दा
अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदीवर भारताला 25% अतिरिक्त शुल्क लादले आहे. तरीही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे, मात्र त्याचे प्रमाण कमी झाले आहे. रशिया अजूनही भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी नुकतेच सांगितले की, भारत अमेरिकेकडून तेल आणि वायूची खरेदी वाढवू इच्छित आहे. न्यूयॉर्क येथे त्यांनी सांगितले की, भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या उद्दिष्टांमध्ये अमेरिकेची महत्त्वाची भूमिका असेल.
युक्रेन युद्धामुळे अनेक देशांनी रशियाशी व्यापार बंद केला, त्यामुळे रशियाला तेलावर सवलत द्यावी लागली. भारत आपल्या तेल गरजेच्या सुमारे 90% आयात करतो. स्वस्त रशियन तेलामुळे भारताला आपले तेल आयात बिल कमी करण्यास मदत झाली आहे. इराण आणि व्हेनेझुएलाचे तेलही असेच स्वस्त असेल. भारताने 2019 मध्ये इराणकडून तेल खरेदी बंद केली होती, तर देशातील सर्वात मोठी रिफायनरी रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदा व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी बंद केली.
अमेरिकी तेलाचा पर्याय –
भारतीय कंपन्या मध्य पूर्वेकडून तेल खरेदी वाढवू शकतात, परंतु यामुळे आयात बिल वाढेल. जुलैमध्ये भारतीय कंपन्यांनी रशियन तेलासाठी प्रति बॅरल सरासरी 68.90 डॉलर दिले, तर सौदी अरेबियाच्या तेलाची किंमत 77.50 डॉलर आणि अमेरिकी तेल 74.20 डॉलर प्रति बॅरल होते. भारत हा रशियन तेल आयात करणारा सर्वात मोठा ग्राहक आहे, तर एकूणच चीन प्रथम क्रमांकावर आहे.





