India’s Independence Day : भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनाला जगभरातून शुभेच्छा; जागतिक पातळीवरील भारताच्या भूमिकेचे कौतुक
India's Independence Day : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रशिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, सिंगापूर, मालदीवसह अनेक देशांनी शुभेच्छा देत भारताच्या प्रगतीचे कौतुक केले.

India’s Independence Day : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जगभरातील अनेक देशांनी भारत आणि भारतीयांना शुभेच्छा दिल्या. भारताच्या गेल्या आठ दशकांतील प्रगतीचे कौतुक करताना विविध देशांनी भविष्यातील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला. फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, सिंगापूर, मालदीव यांसह नेपाळ, भूतान, स्लोव्हाकिया आणि लॅटव्हियानेही भारताला शुभेच्छा दिल्या.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. भारत-रशिया संबंध विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीच्या भावनेतून पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
संयुक्त राष्ट्र, शांघाय सहकार्य संघटना आणि ब्रिक्ससह विविध बहुपक्षीय मंचांवर दोन्ही देश एकत्र काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा आणि स्थैर्याला चालना देण्यासाठी भारत आणि रशिया सकारात्मक भूमिका बजावत राहतील, अशी अपेक्षाही पुतिन यांनी व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी स्वातंत्र्यानंतरच्या आठ दशकांत भारत अधिक मजबूत झाल्याचे म्हटले. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताची कामगिरी आणि क्षमता प्रभावी असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा उल्लेख करत त्यांनी दोन्ही देशांमधील संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधील महत्त्वाचा दुवा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झॉग आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
हर्झॉग यांनी भारत-इस्रायल मैत्री अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली. मुइज्जू यांनी परस्पर सन्मान, समान समृद्धी आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील मैत्रीला भारत-मालदीव संबंधांचा आधार असल्याचे सांगत भागीदारी पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन शनमुगरत्नम यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना पाठवलेल्या पत्रात भारत-सिंगापूरमधील व्यापक धोरणात्मक भागीदारीचा उल्लेख केला. शांततापूर्ण, खुले आणि परस्परांशी जोडलेले क्षेत्र निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांची समान भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले.
व्यापार, डिजिटल अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा संक्रमण या क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्याचीही भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, जगातील विविध देशांमधील भारतीय दूतावासांमध्येही स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. वेगवेगळ्या देशांकडून आलेल्या शुभेच्छांमधून भारताची वाढती जागतिक भूमिका आणि भारतासोबत संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा अधोरेखित झाली.
बलुच नेत्याकडूनही भारताला शुभेच्छा –
पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर एका दिवसाने बलुच नेते मीर यार बलुच यांनी भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांना शुभेच्छा दिल्या.
मोदी यांना पाठवलेल्या संदेशात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या गौरवशाली पर्वाबद्दल बलुचिस्तान प्रजासत्ताकाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानमधील बलुचिस्तानातील प्राचीन हिंगलाज माता मंदिराचा उल्लेख करत त्यांनी हे मंदिर भारताशी असलेल्या आध्यात्मिक संबंधाचे पवित्र प्रतीक असल्याचे म्हटले. या मंदिरामुळे शतकानुशतके दोन्ही प्रदेशांमध्ये संबंध जोडले गेले असल्याचा दावाही त्यांनी केला.





