सलग पाचव्या आठवड्यात निर्देशांकात घट; आयात शुल्काचा निर्देशांकावर व रुपयावर दबाव शक्य

मुंबई : सरलेल्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशाविरोधात शुल्काची घोषणा केली. या कारणामुळे अमेरिकेसह जागतिक शेअर बाजारात विक्रीचे वातावरण होते. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सलग पाचव्या आठवड्यात कमी पातळीवर बंद झाले. त्याचबरोबर भारतीय रुपयावरही या घडामोडीचा नकारात्मक परिणाम झाला.
आगामी आठवड्यातही परिस्थितीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता कमी आहे. सरलेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 863 अंकांनी म्हणजे 1.05 अंकांनी कोसळून 80,599 अंकावर बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 271 अंकांनी म्हणजे 1.09 टक्क्यांनी घसरून 24,565 अंकावर बंद झाला. अमेरिकेच्या 25% आयात शुल्काशिवाय अमेरिकेच्या पतधोरण समितीने नजीकच्या भविष्यात व्याजदर कपातीची शक्यता फेटाळली आहे. अशा परिस्थितीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करीत असल्यामुळे निर्देशांकावर आणि रुपयाच्या मूल्यावर दबाव येत आहे. केवळ 25 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत भारतीय रुपयाचे मूल्य 100 पैशांनी घसरून रुपयाचा भाव 87 रुपये 52 पैसे प्रति डॉलर या पातळीवर आला आहे.
भारताकडे परकीय गंगाजळीचा बराच साठा असला तरी ट्रम्प यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपयाचे मूल्य कमी झाले आहे. रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी वाढणार आहे. या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा लार्ज कॅप निर्देशांक 1.2 टक्क्यांनी कोसळाला. कोटक महिंद्रा बँक, विप्रो, अदानी एंटरप्राइजेस, डी एल एफ, वेदांत या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, लार्सन ट्यूबरो, जिओ फायनान्शिअल सर्विसेस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. मिडकॅप निर्देशांक 1.8 टक्क्यांनी कोसळला. गोदरेज प्रॉपर्टीज. बंधन बँक. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया. झी इंटरटेनमेंट इंटरप्राईजेस या कंपन्यांना विक्रीचा फटका बसला. स्मॉल कॅप 2.5 टक्क्यांनी कोसळला.
देशातील संस्थागत गुंतवणूकदारांचा पुढाकार
गेल्या पाच आठवड्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शेअरची खरेदी पेक्षा विक्री जास्त केली आहे. या आठवड्यात या गुंतवणूकदारांनी 20,524 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मात्र देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी सलग पंधराव्या आठवड्यात खरेदी चालूच ठेवली. या आठवड्यात या गुंतवणूकदारांनी 24,300 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करून निर्देशांकांना आधार दिला. आगामी काळातही हे गुंतवणूकदार निर्देशांक स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत.





