Pune News : स्वानंद प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

पुणे : धायरी येथील स्वानंद प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेली सांगीतिक कवायत आणि क्रांतिकारकांच्या व्यक्तिरेखा या कार्यक्रमाची वैशिष्ट्य ठरली.
या सोहळ्यास अध्यक्षस्थानी दादासाहेब मनोरे प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रशांत मनोरे, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कलावंत प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, यशवंत लायगुडे, विलास नऱ्हे, अभिषेक मनोरे, नानासाहेब चौधरी, संतोष पवार आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, गोपाळ गणेश आगरकर, दामोदर हरी चापेकर, सरोजिनी नायडू, उषा मेहता, राणी चेन्नमा, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी यांच्यासह सिंधुताई सपकाळ यांच्या व्यक्तिरेखा सादर केल्या.
तर इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर कवायती सादर केल्या. तर, एका गटाने “जयोस्तुते जयोस्तुते” हे समूहगीत सादर केले. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले.
या सोहळ्यानिमित्त शाळेची संपूर्ण सजावट विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका डॉ. श्रुती मनोरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. प्रभात फेरी आणि वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.





