ग्रामसेवकांकडून कामगारांना दाखले मिळत नसल्यामुळे बांधकाम कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा परिषद कार्यालयावर जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्यावतीने मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जिल्हाभरातून बांधकाम कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते.या आंदोलनाचे नेतृत्व समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ.करण घुले यांनी केले तर आंदोलनाला विविध समविचारी संघटनां पाठिंबा देवून या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक संघटनेच्या विरोधामुळे ग्रामविकास अधिकारी हे बांधकाम मजुरांना ९० दिवस काम केल्याचे दाखले देत नाहीत याबाबत संघटनांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा व पत्र व्यवहार केला असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना तातडीने दाखले देण्याचा आदेश निर्गमित केलेला होता. तरीही ग्रामसेवकांनी कामगारांना दाखले दिलेले नाही यामुळे बांधकाम मजूर बांधवांना मिळत असलेल्या २८ शासकीय योजनांपासून मुकावे लागत आहे.आरोग्य विमा,मयत विमा व शिष्यवृत्ती यासारख्या लाभांपासुन गरीब मजूर वंचित राहत आहे.
ग्रामसेवकांचे हे कृत्य म्हणजे संघटित गुन्हेगारी आहे असे मत बांधकाम कामगारांचे झालेले आहे.वरिष्ठांचे आदेश असूनही ग्रामसेवक दाखले देत नसल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच काही ग्रामसेवकांच्या कृपाशीर्वादामुळे अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बनावट बांधकाम कामगार नोंदी झालेल्या आहेत अशा बोगस बनावट बांधकाम कामगारांवर कार्यवाही करून त्यांनी लाटलेल्या योजनांची वसुली करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. अशा विविध मागण्यांसाठी मंगळवार (दि.२) रोजी दिवसभर बांधकाम कामगार हे पडत्या पावसात धरणे आंदोलन करत असून यापुढील आंदोलनात दाखले न देणाऱ्या ग्रामसेवकास बांधकाम मजुरांकडून गावबंदी करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्या सर्व संघटनांनी केला आहे.
यावेळी नेवासा,राहुरी,शेवगाव,पाथर्डी,श्रीगोंदा, श्रीरामपूर,नगर तालुका या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात कामगार उपस्थित होते.या आंदोलनासाठी विविध ठिकाणावरून आलेल्या महिलांची संख्या ही लक्षवेधी होती.जिल्हा परिषदेच्या मधल्या दरवाजावर आरक्षित असलेली जागा मजुरांच्या मोठ्या संख्येमुळे कमी पडली. त्यामुळे मजूर नाईलाजाने उघड्यावर बसले.बांधकाम मजुरांच्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत रहदारीची कोंडी झाली.त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे व पोलिसांची काही वेळ मोठी तारांबळ उडाली.





