विकृत कर्मचाऱ्याने मेलने पाठवले अश्लील फोटो

संगमनेर -शहरातील एका शेतकऱ्यांशी संबंधित असणाऱ्या शासकीय कार्यालयात असंवेदनशील प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. एक पुरुष कर्मचाऱ्याने आपल्याच कार्यालयातील अधिकाऱ्याच्या ई-मेलवर अश्लील छायाचित्रे पाठविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत संबंधित अधिकारी कानावर हात ठेवून एकप्रकारे पांघरूण घालत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातल्याने लवकरच “दूध का दूध पाणी का पाणी’ होणार आहे.
संगमनेर शहरातील शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या शासकीय कार्यालयात एका विकृत पुरुष कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांच्या इ- मेलवर अश्लील फोटो असणारा मेल पाठविल्याने कर्मचारी वर्गात अशांततेचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे त्या कर्मचाऱ्याने याप्रकरचा अश्लील मेल पाठविण्याची दुसरी वेळ आहे. पहिल्या वेळेस आपल्यावर कारवाई झाली नाही आणि कुणीही काहीच बोलले नसल्याने त्याने पुन्हा असला इ- मेल पाठवण्याचे धाडस केल्याचे बोलले जात आहे. यावेळी त्या कर्मचाऱ्याने मेल पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच डिलीट केला. मात्र त्या अधिकाऱ्याने त्या मेलचा प्रिंट काढून ठेवल्याने भक्कम पुरावा तयार झाला होता.
परंतु तो मेल डिलीट करण्याअगोदर त्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी ते पहिले होते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याविषयी नाराजी पसरली होती. दरम्यान, त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी महिलांची चौकशी समिती स्थापन करून त्याचा अहवाल पुण्याच्या वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आला. मात्र, दोन महिने उलटूनही त्या कर्मचाऱ्यावर कोणत्याही कारवाई करण्यात आली नाही.
– त्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार
याबाबत त्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आला आहे. त्याचा निर्णय येणे बाकी आहे. त्या कर्मचाऱ्यावर नक्की कारवाई होणार असल्याचे सांगितले.
===============





