Indapur water issue : इंदापूरच्या पाण्यासाठी भाजप थेट मैदानात; पाटबंधारे विभागाला दिला मोठा इशारा
Indapur water issue : इंदापूर तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न पेटला; उन्हाळी आवर्तन तातडीने सुरू करण्यासाठी भाजप नेते प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची धाव.

Indapur water issue – इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांना हक्काचे आवर्तनाचे पाणी मिळत नसल्याने भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेत सिंचन विभागाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. भाजप नेते प्रदीप गारटकर तसेच युवक नेते व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी शेतकरी शिष्टमंडळासह खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांची भेट घेऊन खडकवासला कालव्याचे उन्हाळी आवर्तन तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी केली.
यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात इंदापूर तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यात आले. आवर्तनाच्या पाण्याअभावी तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रावरील ऊस, डाळिंब, भाजीपाला तसेच इतर नगदी पिके धोक्यात आली असून अनेक ठिकाणी पिके जळण्याच्या स्थितीत पोहोचली आहेत. वर्षभराची मेहनत आणि लाखो रुपयांची गुंतवणूक धोक्यात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने इंदापूर तालुक्यावर ही दुर्दैवी वेळ आल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त करण्यात आली. शेतीसमृद्ध म्हणून ओळख असलेल्या इंदापूर तालुक्यात आज शेतकर्यांना हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, ही प्रशासनाच्या नियोजनातील गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला.
प्रदीप गारटकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, शेतकरी हा आधीच नैसर्गिक संकटे, वाढते उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चिततेशी झुंज देत आहे. त्यातच हक्काचे आवर्तन वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. प्रशासनाने केवळ कागदी नियोजन न करता प्रत्यक्ष कृती करून पाणी शेतापर्यंत पोहोचवावे.
प्रवीण माने यांनी सिंचन विभागाच्या पाणी नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकार्यांना थेट जाब विचारला. तालुक्यातील अनेक विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पशुधनासाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पाणी नियोजनातील त्रुटींमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. यासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणेने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिष्टमंडळाने प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकरी, जनावरे आणि ग्रामीण भागातील नागरिक यांचे जीवन पाण्यावर अवलंबून असून खडकवासला कालव्याचे उन्हाळी आवर्तन तातडीने सुरू करून पाणी शेवटच्या शेतकर्यापर्यंत पोहोचविण्यात यावे. अन्यथा शेतकर्यांच्या न्यायासाठी व्यापक लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या शिष्टमंडळात प्रदीप गारटकर, प्रवीण माने, अनिल पवार, मारुती वणवे, बाळासाहेब पानसरे, वसिम बागवान, संजय शिंदे, सचिन शिरसट, आकाश माने, किरण गाणबोटे, तेजस देवकाते, राजकुमार जठार, राम आसबे, यशवंत कचरे यांच्यासह विविध भागांतील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
“शेतकर्यांचे हक्काचे पाणी वेळेवर मिळाले नाही, तर इंदापूरची शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडेल. त्यामुळे सिंचन विभागाने तातडीने आवर्तन सुरू करून शेतकर्यांना दिलासा द्यावा.”
– प्रदीप गारटकर, भाजप नेते
“उभी पिके जळत आहेत, जनावरांना पाणी नाही आणि नागरिक त्रस्त आहेत. आता विलंब नको, शेतकर्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलेच पाहिजे.”
– प्रवीण माने, माजी सभापती, पुणे जिल्हा परिषद






