Indapur Politics : न्याय देणारे नेतृत्व म्हणजे प्रदीप गारटकर – माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर – इंदापूर शहरातील सर्व जाती-धर्मांना समान न्याय देणारे, अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहणारे नेतृत्व म्हणजे प्रदीप गारटकर, असे गौरवोद्गार माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले. लोकशाहीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता गारटकर यांच्यात आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा हा लढवय्या नेता इंदापूरच्या नागरिकांचा आधार आहे, असे पाटील म्हणाले.प्रदीपदादा आगे बढो अशा घोषणा देत कृष्णा-भीमा विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी प्रदीप गारटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी इंद्रेश्वर व सिद्धेश्वर देवस्थानचे दर्शन घेऊन मुख्य बाजारपेठेतून भव्य रॅली काढली. इंदापूरच्या एकात्मतेसाठी इंदापूरमध्ये सर्व जाती-धर्म, बारा बलुतेदार, व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक असे विविध घटक राहत असल्याने त्यांच्या चिंता व प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून कृष्णा-भीमा विकास आघाडी स्थापन झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला ठेवले आहेत.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षांची एकजूट गारटकर यांच्या पाठीशी उभी आहे, असे त्यांनी नमूद केले. प्रदीप गारटकर उमेदवारीस तयार नसतानाही आम्ही स्पष्ट सांगितले, या शहरासाठी सक्षम नेतृत्वाचा एकच पर्याय म्हणजे प्रदीप गारटकर. 15 वर्षे आम्ही कारभार केला; नंतर गारटकरांनी नगरपालिकेचे उत्तम नेतृत्व केले. आज नागरिकांच्या प्रगतीसाठी आम्ही तिघेही एकत्र आलो आहोत. यावेळी माजी आमदार यशवंतराव माने, भाजप नेते प्रवीण माने, मयूर पाटील यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती राहिली.
रॅलीदरम्यान नागरिकांचा उस्फूर्त उत्साह पाहायला मिळाला.माझी इच्छा नव्हती या पदासाठी उभे राहण्याची. परंतु कार्यकर्त्यांनी केलेला आग्रह, दिलेली साथ आणि विश्वास या सर्वामुळेच आज मी हे पाऊल उचलत आहे, असे सांगत गारटकर यांनी आपल्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत पुढे म्हटले, आजपर्यंत मी जे समाजकार्य केले ते गोरगरीब आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या बळावर केले आहे. मी उभा आहे म्हणजे तुम्ही उभे आहात ही भावना मनातून कधीच ढळली नाही. आजही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हात माझ्या पाठीशी आहे, हीच माझी खरी ताकद आहे.
“अन्यायाविरुद्ध भक्कम उभे राहणारे नेतृत्व म्हणजे गारटकर. व्यापारी, नगरपरिषद कर्मचारी आणि शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न यांना न्याय देऊ शकणारे नेतृत्व फक्त प्रदीप गारटकरांचे आहे. लहानपणापासून मी त्यांना पाहतो आहे. कोणावरही अन्याय झाला तर गारटकर दादा पुढे येऊन त्याला न्याय मिळवून देतात.”
-प्रवीण माने, भाजप नेते
“मी पक्षाबाबत जे काही बोललो, ते कार्यकर्त्यांच्या मनातील भावना मांडल्या. जिल्ह्यातून तुम्ही योग्य बोललात, असे म्हणत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हीच भावना राज्यभर पोहोचली पाहिजे. त्यामुळेच मी नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीत उतरतो आहे, असे प्रदीप गारटकर म्हणाले. तसेच त्यांनी मोठा राजकीय निर्णय जाहीर करत सांगितले, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदाचा आजच राजीनामा देत आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करीत आहे.”
-प्रदीप गारटकर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार





