Indapur Politics : निमगाव केतकी-शेळगाव गटात भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने ; माने विरुद्ध जाधव पुन्हा एकदा रिंगणात

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी-शेळगाव जिल्हा परिषद गटातील निवडणुकीची रंगत यंदा लक्षणीय वाढली आहे. आरक्षण सर्वसाधारण (महिला) असल्याने नव्या नेतृत्वाला वाव मिळणार असला, तरी राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत. या गटात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने येत असून, माने विरुद्ध जाधव अशी लढत पुन्हा एकदा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
पूर्वीचा ‘निमगाव केतकी-निमसाखर’ हा गट आता ‘निमगाव केतकी-शेळगाव’ या नव्या स्वरूपात अस्तित्वात आला असून, या गटात एकूण 12 गावे समाविष्ट आहेत. निमगाव केतकी गणात व्याहाळी, कचरवाडी, गोतोंडी, हगारवाडी ही गावे असून, शेळगाव गणात कडबनवाडी, रुई, मराडवाडी, थोरातवाडी, शिरसटवाडी आणि निमसाखर या गावांचा समावेश आहे.या जिल्हा परिषदेच्या गटात नव्याने रुई गाव आल्यामुळे राजकीय तापमान वाढेल असे बोलले जात आहे.
या निवडणुकीत भाजपचे युवा नेते प्रवीण माने यांच्या रुई गावाचा या गटात समावेश झाल्याने राजकीय समीकरणांमध्ये नवे वळण आले आहे. विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून तब्बल चाळीस हजार मते मिळवून नंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माने यांच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे भाजपचा प्रभाव या गटात स्पष्टपणे जाणवू लागला आहे. समाजीय समीकरण ठरणार निर्णायक या गटात ठरणार असून, मराठा, माळी आणि धनगर या तीन प्रमुख समाजांचे मतदार आहेत. या तिन्ही घटकांचे संतुलन साधणे हे सर्व पक्षांसाठी निर्णायक ठरणार असून, याच समीकरणावर निकालाचा ताळेबंद अवलंबून राहणार आहे.
हर्षवर्धन पाटलांच्या बालेकिल्ल्याला आव्हान..
राज्याचे माजी सहकार मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते हर्षवर्धन पाटील यांचा या गटावर अनेक वर्षे दबदबा राहिला आहे. माळी समाजाचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात ‘माळी मोट’ पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभी होती; मात्र गेल्या काही वर्षांत माळी समाजातील काही प्रभावी नेते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे वळल्याने पाटील यांच्यासमोर नवे राजकीय आव्हान निर्माण झाले आहे.
इच्छुकांची फळी मोठी..
या गटातील संभाव्य उमेदवारांची चर्चा सध्या जोरात असून, इच्छुकांची फळीही मोठी आहे. त्यात मयुरी प्रवीण माने (भाजप), सोनाली तुषार जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), अमृता डोंगरे (सरपंच प्रवीण डोंगरे यांच्या पत्नी, राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), तसेच वृषाली संदीप भोंग, गोरख आदलिंग, लालासाहेब पवार, अॅड. लक्ष्मण शिंगाडे, राहुल जाधव, भारती दुधाळ, राजकुमार जठार, माऊली चवरे आदींची नावे चर्चेत आहेत.





