Indapur News : कळसमध्ये पाझर तलाव कोरडाठाक! विहिरींनी तळ गाठला; आता खडकवासला कालवाच शेवटचा आधार?
Indapur News : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर! पाझर तलाव आटल्याने कळस गावच्या पाणीपुरवठा योजनेवर परिणाम; आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरतेय.

Indapur News – कळस (ता. इंदापूर) परिसरात फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीलगतचा पाझर तलाव कोरडाठाक पडला असून शेतकऱ्यांच्या नजरा खडकवासला कालव्याच्या आवर्तनाकडे लागल्या आहेत. परिसरातील ओढे, नाले कोरडे पडले असून विहिरी, कुपनलिकांची पाणी पातळीदेखील दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना शेतपिकांना पाणी देण्यासाठी आतापासूनच कसरत करावी लागत आहे. गहू, हरभरा पिकांबरोबरच उसासह इतर पिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे. शेतातील पिकांनी माना टाकल्या यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने येत्या काळात येथील शेतीसोबत पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
खडकवासला कालव्याद्वारे वेळेत आवर्तन सोडल्यास काहीअंशी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, त्यामुळे जलसंपदा विभागाने खडकवासला कालव्याद्वारे वेळेत आवर्तन सोडावे, अशी मागणी खडकवासला कालव्यालगतच्या शेतकऱ्यांमधून होत आहे.
“या हंगामातील गहू, मका, हरभरा जनावरांचा चारा ही पिके जळू लागलेली आहेत. त्यामुळे खडकवासला कालव्याचे तातडीने अवर्तन सोडण्यात यावे. पाटबंधारे विभागाने इंदापूर तालुक्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन केलेले नाही. आवर्तन त्वरित न सोडल्यास शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरणार नाही.”
– विजय गावडे, खडकवासला प्रकल्पग्रस्त शेतकरी, कळस
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीकडे लक्ष
धरणातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबरमध्ये होणारी ‘कालवा सल्लागार समिती’ची बैठक यंदा विविध निवडणुकांच्या धांदलीमुळे लांबणीवर पडली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून कालवा सल्लागार समितीची बैठक वेळेवर पार पडत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच, जिल्ह्याचे नेतृत्व करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत संथपणा आला आहे. परिणामी, ही महत्त्वाची बैठक कधी होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. परिणामी कालवा सल्लागार समितीची बैठक केव्हा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





