Indapur News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘कर्मयोगी’ कारखाना देणार जिल्ह्यातील सर्वाधिक ऊसदर?

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर – कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि. आणि ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर प्रा. लि. यांच्या सहयोगातून गळीत हंगाम 2025-26 चा शुभारंभ सोमवारी (दि. 3) माजी मंत्री आणि कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी पाटील म्हणाले, सहकार टिकवण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग असून, यामुळे सहकाराची गती आणि शेतकर्यांचा विश्वास दोन्ही दृढ होणार आहेत.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कर्मयोगी साखर कारखाना ही तालुक्याच्या प्रगतीची मातृसंस्था आहे. ओंकार शुगरच्या सहयोगातून शेतकरी आणि कामगारांचे हित सुरक्षित राहील. सर्व ऊस वेळेवर गाळप करून शेतकर्यांना योग्य दर देण्याचा प्रयत्न केला जाईल. ते म्हणाले, केंद्र सरकारने 1050 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचा टेंडर काढला असून, त्यातील 650 कोटी लिटर साखर उद्योगासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
हा निर्णय उद्योग क्षेत्रासाठी दिलासादायक आहे. शेतकर्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन घेण्यावर भर द्यावा.ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले, कर्मयोगी साखर कारखान्याशी सहयोगी तत्वावरचा हा उपक्रम महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. हा मॉडेल सहकार क्षेत्रासाठी आदर्श ठरेल. शेतकर्यांच्या ऊसाचे 15 दिवसांत पेमेंट व कर्मचार्यांना वेळेवर वेतन देणे हे आमचे ब्रीद आहे.
ते पुढे म्हणाले, या हंगामात गाळप उद्दिष्ट पूर्ण झाल्यास पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ऊसदर देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.या वेळी कारखान्याचे संचालक, अधिकारी, ऊस तोडणी वाहतूकदार आणि सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जितेंद्र माने, सूत्रसंचालन नितीन भोसले, तर आभार भूषण काळे यांनी मानले.
जिल्ह्यातील सर्वाधिक ऊसदर देऊ – बोत्रे पाटील
या हंगामात 14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास शेतकर्यांना जिल्ह्यातील सर्वाधिक ऊसदर दिला जाईल, असे ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी सांगितले. त्यांच्या वक्तव्याला उपस्थित शेतकर्यांनी टाळ्यांचा गजर करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.





