प्रभात वृत्तसेवा इंदापूर – पंचवार्षिक नगरपरिषद निवडणुकीची धामधूम चांगलीच रंगत आली असून, रविवार (दि. १६) सुट्टीचा दिवस असूनही उमेदवारांच्या रांगा थांबल्या नाहीत. नगराध्यक्ष पदासाठी २ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ५२ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुधाकर मागाडे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांनुसार रविवारीदेखील अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यालय सुरू ठेवण्यात आले. याचा फायदा घेत दुपारपासून उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी वाढत गेली.नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज रविवारी दाखल झाले. त्यामध्ये कीर्तीकुमार हनुमंत वाघमारे (वंचित बहुजन आघाडी) व तानाजी अनिल देशमुख (अपक्ष) यांचा समावेश आहे. नगरसेवक पदासाठी ५२ अर्जांचा पाऊस पडला. यापूर्वी दाखल झालेल्या ६ अर्जांसह नगरपरिषदेच्या १० प्रभागांतील २० जागांसाठी एकूण ५८ अर्ज प्राप्त झाले असून, निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्जांसाठीची झालेली गर्दी पाहता इंदापूर नगरपरिषद निवडणूक अधिकाधिक तापू लागल्याचे समीक्षकांचे मत आहे. पक्षनिहाय फेरबदल, गट-तट, स्वतंत्र उमेदवारांचा वाढता कल आणि जोरदार प्रचारयोजना यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. दाखल झालेले ५२ अर्ज -राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १४ -कृष्णा-भीमा विकास आघाडी – २२ -काँग्रेस – १ -अपक्ष – १५