IND W vs WI W 2nd ODI : स्मृती मंधानाच्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद, दुसऱ्या वनडेत रचला इतिहास…

Smriti Mandhana : टीम इंडियाची स्टार बॅट्समन स्मृती मंधानाची बॅट यंदा चांगलीच तळपली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही मंधानाने अर्धशतक झळकावले. भारतीय फलंदाजाने 47 चेंडूत 53 धावांची शानदार खेळी केली. या खेळीसह मंधानाने आणखी एक खास टप्पा गाठला आहे.
मंधानाच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद
वास्तविक, स्मृती मंधानाने वर्षभरात तिसऱ्यांदा म्हणजे 2024 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये 750 हून अधिक धावा करून इतिहास रचला आहे. हा टप्पा गाठणारी मंधाना ही जगातील पहिली फलंदाज ठरली आहे. स्मृतीनं 2018 आणि 2022 वर्षामध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये 750 हून अधिक धावा केल्या होत्या. मंधानासाठी फलंदाजीच्या बाबतीत हे वर्ष आश्चर्यकारक ठरले. मंधाना 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात या सलामीच्या फलंदाजाने 91 धावांची दमदार खेळी केली होती, ज्यामुळे टीम इंडियाने 211 धावांच्या मोठ्या विजयाची चव चाखली होती. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही स्मृतीनं अर्धशतकी खेळी केली. हरमनप्रीत आणि कंपनीने या सामन्यात वेस्ट इंडिजचा 115 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
सालभरात 5 शतके आणि 11 अर्धशतके…
साल 2024 मध्ये स्मृती मंधानाची बॅट जोरदार बोलली आहे. या वर्षी महिला क्रिकेटमध्ये मंधानापेक्षा कोणत्याही फलंदाजाने जास्त धावा केल्या नाहीत. या भारतीय सलामीवीर फलंदाजांनं 2024 मध्ये आतापर्यंत 5 शतके आणि 11 अर्धशतके झळकावली आहेत. मंधानाने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 1655 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत मंधानाने सलग तीन अर्धशतके झळकावली होती, ज्याच्या जोरावर टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली होती.
IND W vs WI W 2nd ODI : टीम इंडियानं विंडीजचा 115 धावांनी उडवला धुव्वा, मालिकेतही घेतली अजेय आघाडी..
वेस्ट इंडिजचा 115 धावांनी पराभव
दरम्यान, भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मंगळवारी(24 डिसेंबर 2024) शानदार विजयाची नोंद केली. या सामन्यात भारतानं हरलीन देओलची शानदार शतकी खेळी आणि त्यानंतर प्रिया मिश्रासह इतर गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 115 धावांनी पराभव केला. यासह भारताने तीन सामन्याच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. शतकवीर हरलीन देओल सामन्याची मानकरी ठरली.





