IND W vs ENG W : मंधाना-कौरची खेळी ठरली व्यर्थ, भारताने गमावला जिंकलेला सामना, इंग्लंड सेमीफायनलमध्ये दाखल

IND W vs ENG W England beat India by 4 runs : इंदूरच्या होल्कर स्टेडियमवर 20 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या महिला वनडे विश्वचषक 2025 च्या 20व्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 4 धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 288 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात भारताला विजयासाठी 289 धावांचे लक्ष्य होते, परंतु हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 4 धावांनी मागे राहिला. स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्या शानदार खेळीही भारताला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. या विश्वचषकातील ही भारताची सलग तिसरी हार ठरली, तर इंग्लंडने या विजयासह सेमीफायनलमधील आपले स्थान निश्चित केले.
इंग्लंडची मजबूत फलंदाजी, हीथर नाईटचे शानदार शतक
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडला टॅमी ब्यूमॉन्ट आणि एमी जोन्स यांनी पहिल्या गड्यासाठी 73 धावांची दमदार भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. यानंतर हीथर नाईटने 91 चेंडूंमध्ये 15 चौकार आणि एका षटकारासह 109 धावांची खणखणीत खेळी केली. एमी जोन्सने 56 धावा, कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटने 38 धावा, टॅमी ब्यूमॉन्टने 22 धावा, तर चार्लोट डीनने नाबाद 19 धावा केल्या. सोफिया डंकले (15), एम्मा लॅम्ब (11) आणि सोफी एक्लेस्टोन (3) यांनीही योगदान दिले. भारताकडून गोलंदाजीमध्ये दीप्ती शर्माने सर्वाधिक 4 गडी टिपले, तर श्री चरणीने 2 गडी बाद केले.
England win by 4 runs. #TeamIndia fought hard in a closely contested match and will look to bounce back on Thursday.
Scorecard ▶ https://t.co/jaq4eHaH5w#WomenInBlue | #CWC25 | #INDvENG pic.twitter.com/f9xKaO1ydg
— BCCI Women (@BCCIWomen) October 19, 2025
स्मृती-हरमनप्रीतची भागीदारी ठरली व्यर्थ –
289 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर प्रतिका रावल अवघ्या 14 चेंडूंमध्ये 6 धावा काढून बाद झाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हरलीन देओलने 31 चेंडूंमध्ये 24 धावा केल्या. यानंतर स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 125 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली, ज्यामुळे भारताचा विजय जवळपास निश्चित वाटत होता. परंतु, स्मृती मंधाना बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजी कोसळली.
हेही वाचा – Pakistan Afghanistan War : तीन अफगाणी क्रिकेटपटूंच्या मृत्यूनंतर आयसीसीचे निवेदन, पाकिस्तानचा संताप!
दीप्ती शर्माने 57 चेंडूंमध्ये 50 धावांची खेळी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या बाजूने तिला पुरेशी साथ मिळाली नाही. स्मृती मंधानाने 94 चेंडूंमध्ये 88 धावा, तर हरमनप्रीत कौरने 70 चेंडूंमध्ये 70 धावा केल्या. तरीही भारताला 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.या पराभवामुळे भारतीय संघाचा सेमीफायनलचा मार्ग कठीण झाला आहे, तर इंग्लंडने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे.





