IND vs USA : भारताचा विजयी श्रीगणेशा! पावसाच्या लपंडावानंतर अमेरिकेला पाजलं पाणी; अभिज्ञान-हेनिल ठरले शिल्पकार

IND vs USA India beat USA by 6 Wickets : भारतीय युवा संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारताने अमेरिकेचा ६ गडी राखून पराभव केला. कमी धावसंख्येच्या या सामन्यात सुरुवातीला भारतीय संघ अडचणीत सापडला होता, मात्र अभिज्ञान कुंडूच्या संयमी खेळीने १७.२ षटकात खणखणीत षटकार मारुन विजयावर शिक्कामोर्तब केला.
पावसामुळे लक्ष्यात करण्यात आली कपात –
प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेचा डाव अवघ्या १०७ धावांत आटोपला होता. ज्यामध्ये भारताकडून हेनिल पटेलने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने पाठलाग सुरू केला खरा, पण पावसाने आणि खराब प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. बराच वेळ वाया गेल्याने ‘डकवर्थ-लुईस’ नियमानुसार भारताला ३७ षटकांत ९६ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.
For his fantastic 5⃣-wicket haul, Henil Patel is the Player of the Match 👏
India U19 kickstart their campaign with a 6⃣-wicket victory (DLS Method) 🙌
Scorecard ▶️ https://t.co/HWYypvuDhs #U19WorldCup pic.twitter.com/oydCFOsF4i
— BCCI (@BCCI) January 15, 2026
सुरुवातीलाच बसले धक्के –
९६ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी (२) आणि वेदांत त्रिवेदी (२) स्वस्तात बाद झाले. कर्णधार आयुष म्हात्रेने १९ धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण तोही लवकर बाद झाला. भारताची अवस्था ३ बाद २५ अशी नाजूक झाली होती आणि सामना रंगतदार वळणावर आला होता.
हेही वाचा – Mohammad Rizwan : रिझवानचा ‘रिटायर्ड आऊट’वरून अपमान? कामरान अकमल संतापला; म्हणाला, ‘बीबीएल सोडून परत ये!’
अभिज्ञान आणि विहानची महत्त्वपूर्ण भागीदारी –
संकटात सापडलेल्या भारतीय संघाला विहान मल्होत्रा आणि यष्टीरक्षक फलंदाज अभिज्ञान कुंडू यांनी सावरले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करून विजयाचा मार्ग मोकळा केला. विहान १८ धावा काढून बाद झाला असला, तरी अभिज्ञान कुंडूने एक टोक लावून धरले. अखेर कुंडूने कनिष्क चौहानच्या सोबतीने भारताला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, कुंडूने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
फलंदाजीची आकडेवारी:
- अभिज्ञान कुंडू: ४२* धावा (४१ चेंडू, ५ चौकार, १ षटकार)
- आयुष म्हात्रे: १९ धावा
- विहान मल्होत्रा: १८ धावा
अमेरिकन गोलंदाजांची झुंज ठरली अपयशी –
अमेरिकेकडून भारतीय वंशाच्या रित्विक अपिदीने सर्वाधिक २ बळी घेत भारताला सुरुवातीला अडचणीत आणले होते. ऋषभ शिम्पी आणि कर्णधार उत्कर्ष श्रीवास्तव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला, परंतु भारताची मधली फळी भेदण्यात त्यांना अपयश आले.





