IND vs SL 1st T20 : क्रिकेट केवळ जिवनाचा एक भाग – सूर्यकुमार यादव

पल्लेकल्ले – भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शनिवारी येथे खेळविला जाणार आहे. भारतीय संघ आपला नवा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. मात्र, त्याआधी सूर्यकुमार यादवने भारतीय संघाचा कर्णधार झाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव यांनी आपले विचार मांडले.
सूर्यकुमारने म्हटले की, त्याच्यासाठी क्रिकेट हे जीवन नसून जीवनाचा केवळ एक भाग आहे आणि या खेळाने त्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. क्रिकेटमधून सर्वात महत्त्वाची गोष्ट कळते ती म्हणजे तुम्ही किती नम्र राहता. कारण, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट साध्य करता किंवा तुम्ही चांगली कामगिरी करत नसता तेव्हा या काळात तुम्ही किती नम्र राहता, हेच या खेळात अत्यंत महत्वाचे आहे. अर्थात
जेव्हा तुम्ही मैदानावर काही करता तेव्हा ते मैदानावरच सोडले पाहिजे, ते मैदानाबाहेर घेवून जाण्यात काही अर्थ नसतो, असेही त्याने यावेळी म्हटले आहे.
पाय जमिनीवर ठेवायला शिकलो
भारतातील क्रिकेट प्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे, ज्यावेळी तुम्ही चांगली कामगिरी करत असता, त्यावेळी तुम्ही प्रसिद्धीच्या सर्वोच्च बिंदूवर असता. अर्थात दुर्देवाने याची दुसरी बाजू देखील आहे. कारण, जेव्हा तुम्ही खराब खेळता तेव्हा तुम्हाला चाहत्यांच्या अत्यंत प्रखर रोषाला देखील सामोरे जावे लागते. त्यामुळे, या खेळाने मला जमिनीवर पाय ठेवायला शिकविले आहे, असेही सुर्या यावेळी म्हणाला.
लंकेला दोन धक्के
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा याला आजारपणामुळे मालिकेतून माघार घ्याली लागली. तर त्यानंतर नुवान तुषाराला बुधवारी सरावादरम्यान डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले. त्यामुळे नुवानला देखील टी-20 मालिकेतून माघार घ्यावी लागली. मालिकेला काही दिवस असतानाच दोघेही बाहेर झाल्याने संघाला हा तगडा धक्का आहे. या दोघांच्या जागी बदली खेळाडूंची नाव जाहीर करण्यात आली आहेत. नुवान तुषारा याच्या जागी दिलशान मधुशंका आणि दुष्मंथा चमीराच्या जागी असिथा फर्नांडो याचा समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघः
श्रीलंका : चरिथ असलांका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे, महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.





