IND vs SA : भारताचा कसोटी संघ जाहीर! ऋषभ पंतने पुनरागमन करताच ‘या’ खेळाडूला दिला डच्चू

Indian Test Squad Announce for IND vs SA Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यात होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघात पुन्हा एकदा ऋषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. मात्र, संघात फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. संघाची कमान पुन्हा एकदा शुभमन गिलकडे राहील. पंतला पुन्हा उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
एन जगदीशनच्या जागी पंतचे पुनरागमन –
भारतीय संघाने मागील मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर खेळली होती. त्या मालिकेत संघाने उत्कृष्ट खेळ दाखवला होता. त्या मालिकेपासून आतापर्यंत संघात दोन बदल करण्यात आले आहेत. ऋषभ पंत इंग्लंड मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो संघाबाहेर होता. या काळात ध्रुव जुरेलने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच, एन जगदीशनला बॅकअप यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. आता जगदीशन बाहेर पडला असून, त्याच्या जागी पंतचे पुनरागमन झाले आहे. आता यष्टिरक्षणाची पहिली पसंती पंतच राहिल. ध्रुव जुरेलला फलंदाज म्हणून संधी मिळू शकते.
प्रसिध कृष्णा बाहेर, आकाशदीपचे पुनरागमन –
🚨 News 🚨#TeamIndia squad for Test series against South Africa and India A squad against South Africa A announced.
Details 🔽 | @IDFCFIRSTBank https://t.co/dP8C8RuwXJ
— BCCI (@BCCI) November 5, 2025
याशिवाय, गोलंदाजी विभागात एक बदल करण्यात आला आहे. जलदगती गोलंदाज प्रसिध कृष्णाच्या जागी आकाश दीपची एन्ट्री झाली आहे. प्रसिध सध्या भारत अ संघाचा भाग आहेत. त्यामुळे त्याची या संघात निवड झालेली नाही. विशेष म्हणजे या संघात मोहम्मद शमीला संधी देण्यात आलेली नाही. उर्वरित संघ हा मागील वेस्ट इंडिज मालिकेतीलच आहे. सलामी जोडी म्हणून पुन्हा एकदा यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल दिसतील. वेगवान गोलंदाजीची कमान मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह आकाश दीप सांभाळेल
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिला सामना: १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ईडन गार्डन्समध्ये
- दुसरा सामना: २२ नोव्हेंबरपासून, गुवाहाटीत
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.





