IND vs SA 4th T20 : ‘तिलक-सॅमसन’नंतर गोलंदाजांनी केला कहर..! भारतानं मोठ्या विजयासह मालिकेवरही केला कब्जा…

India vs South Africa 4th T20 Score Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार टी-20 सामन्याच्या मालिकेतील अंतिम सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. अशाप्रकारे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने 4 टी-20 सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 284 धावांचे लक्ष्य होते, परंतु दक्षिण आफ्रिकेचा संघ 18.2 षटकांत 148 धावांवरच मर्यादित राहिला.
विजयी धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्सनं सर्वाधिक 43, डेव्हिड मिलरनं 36, मार्को जान्सेननं नॉट आऊट 29 आणि गेराल्ड कोएत्झी याने 12 धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त इतर सर्व फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. रीझा हेन्रिक्स एकही धाव न काढता बाद झाला. रीझा हेन्रिक्सला अर्शदीप सिंगने बाद केले. त्याचवेळी रेयॉन रिक्लेटन 1 धावा काढून हार्दिक पांड्याचा बळी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम 8 चेंडूत 8 धावा करून माघारी परतला तर हेनरिक क्लासेन आपले खाते उघडू शकला नाही.
दक्षिण आफ्रिकेचे 4 फलंदाज 10 धावसंख्येवरच पॅव्हेलियनमध्ये परतले होते, मात्र यानंतर डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोन्ही खेळाडूंनी पाचव्या विकेटसाठी 54 चेंडूत 86 धावांची भागीदारी केली. डेव्हिड मिलर 27 चेंडूत 36 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर ट्रिस्टन स्टब्सने 29 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. मार्को जॅनसेन 12 चेंडूत 29 धावा करून नाबाद परतला.
टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्थी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या, रमनदीप सिंह आणि रवी बिश्नोई या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
तत्पूर्वी, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर चौथ्या टी-20 सामन्यात विजयासाठी 284 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सॅमसन आणि टिळक यांनी तुफानी फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले.
Innings Break!
Absolutely dominating batting display from #TeamIndia at The Wanderers Stadium, Johannesburg⚡️ ⚡️
1⃣2⃣0⃣* from Tilak Varma
1⃣0⃣9⃣* from Sanju SamsonScorecard ▶️ https://t.co/b22K7t8KwL#SAvIND pic.twitter.com/RO9mgJFZnL
— BCCI (@BCCI) November 15, 2024
दुसऱ्या विकेटसाठी या दोन फलंदाजांमध्ये 86 चेंडूत 210 धावांच्या भागीदारी झाली. या विशाल भागीदारीच्या जोरावर भारताने 20 षटकात एक विकेट गमवताना 283 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. गेल्या दोन सामन्यात खातेही उघडू न शकलेल्या सॅमसनने पुन्हा एकदा शतक झळकावले, तर तिलकने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले.
तिलकने 47 चेंडूंत नऊ चौकार व 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 120 धावा केल्या तर सॅमसनने 56 चेंडूंत सहा चौकार व नऊ षटकारांच्या मदतीने नाबाद 109 धावा केल्या. सॅमसन आणि टिळक यांच्याशिवाय अभिषेक शर्माने 18 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 36 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुथो सिपमला याने त्याची एकमेव विकेट घेतली. त्याने 4 षटकात 58 धावा दिल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी धुलाई….
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर फक्त लुथो सिम्पालाच यश मिळाले. लुथो सिम्पलाने अभिषेक शर्माला बाद केले, पण याखेरीज इतर गोलंदाज विकेट्ससाठी तळमळत होते. मार्को जॅन्सन (4 षटकात 42 धावा), गेराल्ड कोएत्झी (3 षटकात 43 धावा), अँडिले सिमेलेन(3 षटकात 47 धावा), केशव महाराज(3 षटकात 42 धावा), एडन मार्कराम (2 षटकात 30 धावा) आणि ट्रिस्टन स्टब्स (1 षटकात 21 धावा) यांना यश मिळाले नाही.
जोहान्सबर्गमध्ये मोडले गेले अनेक विक्रम
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार टी-20 सामन्याच्या मालिकेतील अंतिम सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले आहेत.
तिलकनं मोडला रोहितचा विक्रम ….
तिलकनं रोहितचा खास विक्रम मोडला. भारतासाठी सर्वात मोठी टी20 धावसंख्या बनवण्याच्या बाबतीत त्याने रोहितला मागे टाकले आहे. तिलकने या सामन्यात नाबाद 120 धावा केल्या आहेत. तर रोहितची सर्वोच्च धावसंख्या 118 आहे. त्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले होते. टीम इंडियासाठी सर्वाधिक टी-20 धावा करण्याचा विक्रम शुभमन गिलच्या नावावर आहे. गिलने 2023 मध्ये नाबाद 126 धावा केल्या होत्या.
भारताकडून टी-20 मधील सर्वात मोठ्या भागीदाऱ्या
संजू सॅमसन – तिलक वर्मा : 210*
रोहित शर्मा – रिंकू सिंग : 190*
संजू सॅमसन – दीपक हुडा : 176
सूर्यकुमार यादव – संजू सॅमसन : 173
रोहित शर्मा – केएल राहुल : 165
तिलकच्या नावावर षटकारांचा विक्रम…
तिलकने रोहित आणि सॅमसनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तिलकने या दोघांची बरोबरी केली आहे. रोहित आणि सॅमसनने प्रत्येकी 10 षटकार ठोकले आहेत. तिलकनेही हा पराक्रम केला आहे. या यादीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 9 षटकार मारले होते.
सॅमसनने मोडला राहुल-इशानचा विक्रम…
सॅमसनने केएल राहुल आणि इशान किशनचा रेकॉर्ड मोडला आहे. सॅमसन हा भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. त्याने 4 अर्धशतके केली आहेत. तर इशान आणि राहुलने प्रत्येकी 3-3 अर्धशतके केली आहेत.





