IND vs SA 4th T20 : ‘तिलक-सॅमसन’ची वादळी शतके; टीम इंडियाचा द. आफ्रिकेसमोर विशाल धावांचा डोंगर…

India vs South Africa 4th T20 Score Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार टी-20 सामन्याच्या मालिकेतील अंतिम सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर चौथ्या टी-20 सामन्यात विजयासाठी 284 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सॅमसन आणि टिळक यांनी तुफानी फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले.
Innings Break!
Absolutely dominating batting display from #TeamIndia at The Wanderers Stadium, Johannesburg⚡️ ⚡️
1⃣2⃣0⃣* from Tilak Varma
1⃣0⃣9⃣* from Sanju SamsonScorecard ▶️ https://t.co/b22K7t8KwL#SAvIND pic.twitter.com/RO9mgJFZnL
— BCCI (@BCCI) November 15, 2024
दुसऱ्या विकेटसाठी या दोन फलंदाजांमध्ये 86 चेंडूत 210 धावांच्या भागीदारी झाली. या विशाल भागीदारीच्या जोरावर भारताने 20 षटकात एक विकेट गमवताना 283 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. गेल्या दोन सामन्यात खातेही उघडू न शकलेल्या सॅमसनने पुन्हा एकदा शतक झळकावले, तर तिलकने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले.
तिलकने 47 चेंडूंत नऊ चौकार व 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 120 धावा केल्या तर सॅमसनने 56 चेंडूंत सहा चौकार व नऊ षटकारांच्या मदतीने नाबाद 109 धावा केल्या. सॅमसन आणि टिळक यांच्याशिवाय अभिषेक शर्माने 18 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 36 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुथो सिपमला याने त्याची एकमेव विकेट घेतली. त्याने 4 षटकात 58 धावा दिल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी धुलाई….
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर फक्त लुथो सिम्पालाच यश मिळाले. लुथो सिम्पलाने अभिषेक शर्माला बाद केले, पण याखेरीज इतर गोलंदाज विकेट्ससाठी तळमळत होते. मार्को जॅन्सन (4 षटकात 42 धावा), गेराल्ड कोएत्झी (3 षटकात 43 धावा), अँडिले सिमेलेन(3 षटकात 47 धावा), केशव महाराज(3 षटकात 42 धावा), एडन मार्कराम (2 षटकात 30 धावा) आणि ट्रिस्टन स्टब्स (1 षटकात 21 धावा) यांना यश मिळाले नाही.
तिलकनं मोडला रोहितचा विक्रम ….
तिलकनं रोहितचा खास विक्रम मोडला. भारतासाठी सर्वात मोठी टी20 धावसंख्या बनवण्याच्या बाबतीत त्याने रोहितला मागे टाकले आहे. तिलकने या सामन्यात नाबाद 120 धावा केल्या आहेत. तर रोहितची सर्वोच्च धावसंख्या 118 आहे. त्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले होते. टीम इंडियासाठी सर्वाधिक टी-20 धावा करण्याचा विक्रम शुभमन गिलच्या नावावर आहे. गिलने 2023 मध्ये नाबाद 126 धावा केल्या होत्या.
भारताकडून टी-20 मधील सर्वात मोठ्या भागीदाऱ्या
संजू सॅमसन – तिलक वर्मा : 210*
रोहित शर्मा – रिंकू सिंग : 190*
संजू सॅमसन – दीपक हुडा : 176
सूर्यकुमार यादव – संजू सॅमसन : 173
रोहित शर्मा – केएल राहुल : 165
तिलकच्या नावावर षटकारांचा विक्रम…
तिलकने रोहित आणि सॅमसनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तिलकने या दोघांची बरोबरी केली आहे. रोहित आणि सॅमसनने प्रत्येकी 10 षटकार ठोकले आहेत. तिलकनेही हा पराक्रम केला आहे. या यादीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 9 षटकार मारले होते.





