IND vs SA : कुलदीपची जादू अन् भारताचा जबरदस्त पलटवार! पहिल्या दिवसाखेर द. आफ्रिका २४७/६

IND vs SA 2nd Test Day 1 Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस अत्यंत चुरशीचा ठरला. गुवाहाटी येथे सुरू असलेल्या या सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर ६ बाद २४७ धावा केल्या आहेत. सुरुवातीच्या दोन सत्रांमध्ये आफ्रिकेच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले असले, तरी अंतिम सत्रात भारतीय गोलंदाजांनी जोरदार मुसंडी मारत ४ विकेट्स घेतल्या आणि सामन्यात समतोल राखला.
द. आफ्रिकेची दमदार सुरुवात अन् भारताचा पलटवार –
शुबमन गिलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने संयमी सुरुवात केली. एडन मार्करम आणि रायन रिकेल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर टेम्बा बावुमा (४१ धावा) आणि ट्रिस्टन स्टब्स (४९ धावा) यांनी ८४ धावा जोडल्या. मात्र, सेट होऊनही या फलंदाजांना आपल्या डावाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. टोनी डी झॉर्झी आणि वियान मुल्डर हे देखील चांगली सुरुवात मिळवून बाद झाले.
View this post on Instagram
कुलदीपने दाखवली आपल्या फिरकीची जादू –
View this post on Instagram
तिसऱ्या सत्रात भारताने सामन्याचे चित्र पालटले, ज्यात चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. आफ्रिकेचे फलंदाज जिथे इतर गोलंदाजांना दाद देत नव्हते, तिथे कुलदीपने आपल्या १७ षटकांत ३ महत्त्वपूर्ण विकेट्स (रिकेल्टन, स्टब्स आणि मुल्डर) घेतल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.
हेही वाचा – AUS vs ENG : १०४ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडलं असं! दोन दिवसांतच ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला चारली धूळ
दोन्ही संघांची पुढील रणनीती –
View this post on Instagram
दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ८१.५ षटकांत २४७/६ अशी आहे. सध्या सेनुरान मुथुसामी २५ धावांवर खेळत असून, यष्टिरक्षक काइल वेरिन त्याला साथ देण्यासाठी मैदानात उतरला आहे. मार्को यान्सन सारखे फलंदाज अजून बाकी असल्याने आफ्रिकेचा संघ धावसंख्या ४०० च्या जवळ नेण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच उरलेले ४ गडी बाद करून आफ्रिकेला कमीत कमी धावांत रोखण्याचे भारतीय गोलंदाजांचे लक्ष्य असेल.





