AUS vs ENG 1st Test Highlights : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी अत्यंत थरारक आणि ऐतिहासिक ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, हा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. ॲशेसच्या इतिहासात १९२१ नंतर, म्हणजेच तब्बल १०४ वर्षांनंतर असे पहिल्यांदाच घडले आहे, जेव्हा कसोटी सामन्याचा निकाल केवळ दोन दिवसांत लागला आहे. ट्रॅव्हिस हेडची तुफानी शतक – विजयासाठी मिळालेल्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने आक्रमक शतकी खेळी केली. त्याने ८३ चेंडूत १६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १२३ धावा कुटल्या. त्याला मार्नस लाबुशेन (५१ धावा) आणि जेक वेदराल्ड (२३ धावा) यांची चांगली साथ मिळाली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य सहज पार केले. दुसऱ्या डावात इंग्लंडची गोलंदाजी निष्प्रभ ठरली. मिचेल स्टार्कने घेतल्या १० विकेट्स – तत्पूर्वी, सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात १७२ धावा केल्या होत्या, ज्यात हॅरी ब्रूकने ५२ धावांचे योगदान दिले. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने घातक मारा करत पहिल्या डावात ७ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ५ आणि ब्रायडन कार्सने ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १३२ धावांत रोखले. यामुळे इंग्लंडला ४० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली होती. हेही वाचा – AUS vs ENG : ट्रॅव्हिस हेडच्या तुफानी खेळीने इंग्लंडचा उडवला धुव्वा, ६९ चेंडूत शतक झळकावत लावली विक्रमाची रांग मात्र, दुसऱ्या डावात इंग्लंडचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले आणि संपूर्ण संघ १६४ धावांत गारद झाला. मिचेल स्टार्कने सामन्यात एकूण १० विकेट्स घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. हेडच्या दमदार शतकामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.