IND vs PAK : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, दुसऱ्यांदा केलं असं कृत्य

पाकिस्तानने दुसऱ्यांदा रद्द केला पत्रकार परिषद –
आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानने दुसऱ्यांदा पत्रकार परिषद रद्द केली आहे. यापूर्वी यूएईविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्यांनी असा निर्णय घेतला होता. आता भारताविरुद्धच्या सुपर-4 सामन्यापूर्वी पुन्हा असा प्रकार करून पाकिस्तानने सर्वांचे लक्ष वेधले आहे. याचवेळी, 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पीसीबीने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरक वक्ता डॉ. राहील यांना बोलावले आहे. लीग सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून सात गडी राखून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानी संघात निराशा आहे.
‘नो हँडशेक’ प्रकरणामुळे पाकिस्तान संतप्त –
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने आशिया कपमध्ये पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पाकिस्तानी संघाला खटकला आहे. त्यानंतर पाकिस्तान सातत्याने काही ना काही गैरप्रकार करत आहे. याच दरम्यान, पीसीबीने सामना रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर भारतीय संघाविरुद्ध कारवाई न केल्याचा आरोप केला. तसेच, त्यांनी मागण्या मान्य न झाल्यास टूर्नामेंटमधून माघार घेण्याची धमकी दिली आणि यूएईविरुद्धच्या तिसऱ्या गट सामन्याला उशीर केला. मात्र, पायक्रॉफ्ट यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर पीसीबीने टूर्नामेंटमध्ये खेळण्यास सहमती दर्शवली.
हेही वाचा – IND vs OMA : संजू सॅमसनचा मोठा पराक्रम, ओमानविरुद्ध अर्धशतक झळकावत विराट-रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री
आयसीसीचा पीसीबीला दणका –
या प्रकरणात आणखी वाद वाढला जेव्हा आयसीसीने पीसीबीला कठोर ईमेल पाठवला. कारण, पीसीबीनेने पायक्रॉफ्ट यांच्यासोबतच्या बैठकीचा व्हिडीओ बनवून तो ऑनलाइन प्रसिद्ध केला होता. पीसीबीने याला आयसीसी प्रोटोकॉलच्या कक्षेत असल्याचे सांगितले. मात्र, या मैदानाबाहेरील नाट्यामुळे पाकिस्तानी संघावर दबाव वाढला आहे.





