IND vs PAK : भारताने पाकिस्तानविरुद्धच्या फायनलपूर्वी घेतला मोठा निर्णय! हस्तांदोलनानंतर ‘या’ गोष्टीला दिला नकार

IND vs PAK India Denied Trophy Photoshoot with Pakistan : 28 सप्टेंबर रोजी दुबईत होणारा आशिया कप 2025 चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक लढत ठरणार आहे. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच हे दोन संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येत आहेत. मात्र, या सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे एक जुनी परंपरा मोडली गेली आहे. दरवर्षीप्रमाणे अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांचा ट्रॉफीसह फोटोशूट करण्याची प्रथा होती, परंतु यंदा भारतीय संघाने यास स्पष्ट नकार दिला.
भारतीय कर्णधाराचा फोटोशूटला नकार –
भारतीय संघाने पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचा संपर्क टाळण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहत, कर्णधार सूर्यकुमार यादवने अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानी कर्णधार सलमान आघासोबत ट्रॉफीसह फोटो काढण्यास नकार दिला. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा यंदा खंडित झाली आहे. भारतीय संघाच्या या निर्णयामुळे स्पर्धेतील तणाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
🚨 TEAM INDIA DENIED FOR TROPHY PHOTOSHOOT BEFORE ASIA CUP FINAL 🚨
– Team India is not interested to do Trophy photoshoot with Pakistan team before Asia Cup 2025 Final. (Vaibhav Bhola). pic.twitter.com/F0aGrdXNPI
— Tanuj (@ImTanujSingh) September 27, 2025
स्पर्धेतील तणावाची पार्श्वभूमी –
या स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव सातत्याने दिसून आला. याची सुरुवात दोन्ही संघांमधील पहिल्या सामन्यापासून झाली, जेव्हा टॉसदरम्यान भारतीय कर्णधाराने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. सामना संपल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. सुपर फोर टप्प्यातील सामन्यादरम्यानही भारतीय संघाने हीच भूमिका कायम ठेवली आणि सामन्यापूर्वी तसेच सामन्यानंतर कोणताही संपर्क टाळला.
हेही वाचा – ISSF Junior World Cup : रश्मिका-कपिलची कमाल! ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदकाची लयलूट
ऐतिहासिक सामन्याची पार्श्वभूमी –
आशिया कप 2025 चा अंतिम सामना केवळ क्रीडास्पर्धेच्या दृष्टीने नव्हे, तर दोन्ही देशांमधील राजकीय आणि सामाजिक तणावामुळेही विशेष लक्षवेधी ठरत आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या एका भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे हा सामना अधिकच चर्चेत आला आहे. या सामन्याला ऐतिहासिक आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी आयोजकांकडून सर्वतोपरी प्रयत्न होत असले, तरी भारतीय संघाच्या या निर्णयामुळे एका परंपरेला तडा गेला आहे.





