IND vs PAK Final in Under-19 Asia Cup 2025 : अंडर-१९ आशिया चषक २०२५ च्या विजेतेपदासाठी आता भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. आपापल्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा, तर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. रविवारी होणाऱ्या या ऐतिहासिक सामन्याकडे आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. भारताचा श्रीलंकेवर विजय; विहान-एरॉन चमकले दुबईतील पावसामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना २० षटकांचा करण्यात आला होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १३८ धावा केल्या होत्या. भारतासमोर विजयासाठी १३९ धावांचे माफक आव्हान होते. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार आयुष म्हात्रे आणि स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाल्याने भारतीय संघ २५ धावांवर २ बाद अशा अडचणीत सापडला होता. अशा कठीण प्रसंगी एरॉन जार्ज आणि विहान मल्होत्रा यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांनी संयमी पण आक्रमक फलंदाजी करत आपापली अर्धशतके पूर्ण केली आणि टीम इंडियाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला. एरॉनने ४८ चेंडूंत ५४ धावांची खेळी केली, तर विहानने ४५ चेंडूंत ६१ धावा कुटल्या. हेही वाचा – Cooper Connolly : प्रीती झिंटाचा मास्टरस्ट्रोक यशस्वी! ऑक्शनमध्ये बोली लागताच ‘या’ खेळाडूची तळपली बॅट पाकिस्तानची बांगलादेशवर मात – दुसरीकडे, पाकिस्तानने दुसऱ्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव केला. हा सामना पावसामुळे २७ षटकांचा करण्यात आला होता. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना केवळ १२१ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने हे आव्हान अवघ्या १६.३ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. हेही वाचा – 1X Betting App Case : ईडीची मोठी कारवाई! युवराज सिंग, सोनू सूदसह ‘या’ सेलिब्रिटींची मालमत्ता जप्त रविवारी रंगणार ‘फायनल’चा थरार – येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेच्या साखळी फेरीत जेव्हा हे दोन्ही संघ भिडले होते, तेव्हा भारताने पाकिस्तानचा मोठा पराभव केला होता. त्यामुळे अंतिम फेरीतही भारतीय युवा संघ आपला दबदबा कायम राखून आशिया चषकावर नाव कोरणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.