IND vs OMA : संजू सॅमसनचा मोठा पराक्रम, ओमानविरुद्ध अर्धशतक झळकावत विराट-रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री

IND vs OMA Sanju Samson Shines : आशिया कप 2025 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने आपली दमदार कामगिरी कायम ठेवत ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकून सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शुक्रवारी अबू धाबी येथे ओमानवर 21 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात केरळचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन याने दमदार खेळी करत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला. यासह त्याने एक खास पराक्रम केला आहे.
संजू सॅमसनचा खास क्लबमध्ये समावेश –
30 वर्षीय संजू सॅमसनला ओमानविरुद्धच्या सामन्यात प्रथमच फलंदाजीची संधी मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने 45 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 56 धावांची खणखणीत खेळी केली. या अर्धशतकासह त्याने भारतीय क्रिकेट इतिहासात एक खास पराक्रम नोंदवला. संजू टी-20 आशिया कपमध्ये भारतासाठी अर्धशतक झळकावणारा सहावा फलंदाज ठरला. यापूर्वी हा पराक्रम विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी केला आहे.
Sanju Samson got just 1 chance to bat so far in the Asia Cup and he turned it into a Man of the Match performance.
Haters can cry but we keep letting the bat talk ✅ pic.twitter.com/eKm0QYUl4B
— Anurag™ (@Samsoncentral) September 19, 2025
भारत-पाकिस्तान सुपर 4 मध्ये आमने-सामने –
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा रोमांचक लढत होणार आहे. उद्या, 21 सप्टेंबर रोजी दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुपर 4 मधील हा बहुप्रतिक्षित सामना रंगणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला होता. आता सुपर 4 मध्येही भारतीय संघ असाच दमदार प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा – IND vs OMA : अर्शदीप सिंगने रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज
संजू सॅमसन या सामन्यातही महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. आशिया कपपूर्वी केरळ क्रिकेट लीगमध्ये त्याने धावांचा डोंगर रचला असून, तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघ सध्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली अजेय आहे. उद्याच्या सामन्यातही त्यांच्याकडून अशीच आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण कामगिरी अपेक्षित आहे.





