IND vs OMA : भारताने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील दुसरा संघ

ओमानविरुद्ध ऐतिहासिक सामना –
ओमान हा भारताचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 19 वा प्रतिस्पर्धी संघ ठरला. दोन वेळा टी-20 विश्वचषक विजेता असलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध सर्वाधिक 32-32 सामने खेळले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 31 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, भारत हा एकमेव संघ आहे ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या सर्व संघांविरुद्ध सामने खेळले, त्या प्रत्येक संघाविरुद्ध 50 टक्क्यांहून अधिक विजय मिळवले आहेत.
आशिया कप 2025 मधील भारताचा दमदार प्रवास –
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एशिया कप 2025 मध्ये ग्रुप ‘ए’ मधील आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. आठ वेळा एशिया कप विजेता असलेल्या भारतीय संघाने 10 सप्टेंबर रोजी दुबईत यजमान संयुक्त अरब अमिरातचा 9 गडी राखून पराभव केला. त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. आज, 19 सप्टेंबर रोजी भारत ओमानविरुद्ध मैदानात उतरला आहे.
हेही वाचा – IND vs OMA : नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये केले दोन बदल
भारताने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 250 सामने पूर्ण केले असून, या यशासह तो पाकिस्ताननंतर 250 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा जगातील दुसरा संघ ठरला आहे. पाकिस्तान 275 सामन्यांसह या यादीत अव्वल स्थानावर आहे. भारताचा हा ऐतिहासिक टप्पा देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे.





