IND vs NZ : भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी मिळाले २५२ धावांचे लक्ष्य, न्यूझीलंडने फिरकी गोलंदाजांसमोर टेकले गुडघे

IND vs NZ New Zealand has set a target of 252 runs for India : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना किवी संघ ५० षटकांत सात विकेट्स गमावून २५१ धावा करू शकला. शेवटच्या पाच षटकांत ५० धावा आल्या, ज्यामुळे न्यूझीलंडला हा आकडा गाठता आला. यामध्ये मायकेल ब्रेसवेलने सर्वात मोठे योगदान दिले. ब्रेसवेलने ४० चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५३ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय डॅरिल मिशेलने ६३ आणि ग्लेन फिलिप्सने ३४ धावा केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या किवी संघाची सुरुवात चांगली झाली होती. विल यंग आणि रचिन रवींद्र यांच्यात ५७ धावांची भागीदारी झाली. वरुण चक्रवर्तीने यंगला बाद करून किवींना पहिला धक्का दिला. यानंतर, कुलदीपची अद्भुत कामगिरी पाहायला मिळाली. त्याने रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांना एका पाठोपाठ पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हे दोन्ही फलंदाज न्यूझीलंडसाठी आधारस्तंभ आतापर्यंत राहिले आहेत. या दोन विकेट्स पडताच किवीज संघ कमकुवत झाला. जिथे एकेकाळी किवी संघ सहा पेक्षा जास्त धावांच्या वेगाने धावा करत होता. मात्र, पहिल्या तीन विकेट्स १८ धावांच्या आत गमावल्यानंतर, धावगती साडेचारच्या जवळपास आली.
Innings Break!
Clinical bowling effort from #TeamIndia bowlers as they restrict New Zealand to a total of 251/7 in the Finals of the Champions Trophy!
Scorecard – https://t.co/OlunXdzr5n #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/F4WmHJ4wJR
— BCCI (@BCCI) March 9, 2025
विल यंग १५ धावा करून बाद झाला. त्याच वेळी, रचिनने २९ चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३७ धावांची खेळी केली. विल्यमसनला फक्त ११ धावा करता आल्या. यानंतर, डॅरिल मिशेलने टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्ससह डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मिचेलने लॅथमसोबत ३३ आणि फिलिप्ससोबत ५७ धावांची भागीदारी केली. लॅथमला जडेजाने तर फिलिप्सला वरुणने बाद केले. लॅथमला फक्त १४ धावा करता आल्या आणि फिलिप्सला फक्त ३४ धावा करता आल्या.
भारतीय फिरकीपटूंनी केली शानदार गोलंदाजी –
दरम्यान, डॅरिल मिशेलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. १०१ चेंडूत तीन चौकारांसह ६३ धावा काढल्यानंतर तो बाद झाला. शेवटी ब्रेसवेलने आक्रमक फलंदाजी केली. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. आठ धावा करून सँटनर धावबाद झाला. भारताकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दरम्यान, जडेजाने एक विकेट्स घेतली. शमीने एक विकेट घेतली आणि एक खेळाडू धावबाद झाला.





