Champions Trophy Final 2025 : ‘तो आमच्यासाठी सर्वात मोठा धोका…’, फायनलपूर्वी भारताच्या ‘या’ खेळाडूबद्दल न्यूझीलंडच्या कोचचे मोठे वक्तव्य

IND vs NZ Gary Stead says Varun Chakravarthy is our biggest threat : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना रविवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी मान्य केले की, रविवारी भारताविरुद्ध होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात वरुण चक्रवर्ती त्यांच्या संघासाठी सर्वात मोठा धोका असेल. स्टीड म्हणाले की या ‘मिस्ट्री स्पिनर’ गोलंदाजाला सामोरे जाण्यासाठी त्यांच्या संघाला त्यांची विचारसरणी वाढवावी लागेल.
अंतिम सामन्यात तो सर्वात मोठा धोका –
गॅरी स्टीड म्हणाले, “आमच्याविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात वरूणने ४२ धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या. त्यामुळे, आम्हाला आशा आहे की तो खेळेल. तो खूप चांगला गोलंदाज आहे आणि त्याने आमच्याविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याचे कौशल्य उत्तम प्रकारे दाखवले. अंतिम सामन्यात तो आमच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. म्हणून आम्हाला त्याला निष्फळ ठरवण्यासाठी लक्ष केंद्रित करावे लागेल. त्याच्याविरुद्ध धावा कशा काढता येतील यावरही विचार करावा लागेल.”
भारताला हरवले तर खूपच आनंद –
न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक पुढे म्हणाले , “मला असे म्हणायचे आहे की, सुरुवातीला आपल्याकडे आठ संघ होते आणि आता फक्त दोनच उरले आहेत. या टप्प्यावर पोहोचणे खूप रोमांचक आहे आणि आम्हाला वाटते की, हा सामना देखील इतर कोणत्याही सामन्यासारखाच आहे आणि जर आम्ही रविवारी चांगला खेळ करून भारताला हरवू शकलो तर मला खूप आनंद होईल.” न्यूझीलंड संघाला ग्रुप अ मधील त्यांचा शेवटचा सामना खेळण्यासाठी दुबईला यावे लागले आणि नंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेमीफायनल खेळण्यासाठी पाकिस्तानला परतावे लागले.
अंतिम सामन्यासाठी शरीर आणि मन योग्य स्थितीत हवे –
किवी प्रशिक्षक स्टीड यांनी मान्य केले की वेळापत्रक धावपळीचे होते, परंतु त्यांचा संघ अशा परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम आहे. ते म्हणाले, “लाहोरमध्ये खेळल्यानंतर आम्ही इथे येते आलो आहोत यात काही शंका नाही आणि काल आम्ही संपूर्ण दिवस प्रवासात घालवला. थोडे अस्वस्थ वाटतेय, पण आता आमच्याकडे सामन्याची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. आम्ही आता स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात आहोत आणि कधीकधी जास्त सराव करण्याची गरज नसते. अंतिम सामन्यात खेळण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचे शरीर आणि मन योग्य स्थितीत आणावे लागेल आणि पुढील दोन दिवस आम्ही त्यावरच लक्ष केंद्रित करू.”





