IND vs NZ : इशानचे शतक अन् अर्शदीपचा ‘फायफर’; भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत मालिका ४-१ ने जिंकली
IND vs NZ : इशान किशनचे वादळी शतक आणि अर्शदीप सिंगच्या पाच विकेट्सच्या जोरावर भारताने पाचव्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ४६ धावांनी धुव्वा उडवला.

IND vs NZ India won by 46 runs 5th T20I : इशान किशनचे वादळी शतक आणि अर्शदीप सिंगच्या पाच विकेट्सच्या जोरावर भारताने पाचव्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ४६ धावांनी धुव्वा उडवला. यासह पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ अशा फरकाने खिशात घातली.
अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना इशान-सूर्याच्या फटकेबाजीच्या जोरावर २७१ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १९.४ षटकांत २२५ धावांत गारद झाला. यासह भारतीय संघाने मालिकेचा शेवटही गोड केला.
धावफलकावर २७१ धावांचा ‘डोंगर’ –
इशान किशन झळकावले पहिले टी-२० शतक
कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा स्वस्तात परतल्यानंतर इशान किशनने मैदानाचा ताबा घेतला. इशानने केवळ ४३ चेंडूंत ६ चौकार आणि १० उत्तुंग षटकारांच्या मदतीने १०३ धावांचे स्फोटक शतक ठोकले. त्याला दमदार साथ देताना कर्णधार सूर्याने ३० चेंडूंत ६३ धावांची वेगवान खेळी केली. त्यानंतर हार्दिक पंड्याने फिनिशिंग टच देताना १७ चेंडूंत ४२ धावा कुटल्या, ज्यामुळे भारताला ५ बाद २७१ ही महाकाय धावसंख्या उभारता आली.
A fantastic finish to the T20I series in Trivandrum 🏟️🥳#TeamIndia register a 46-run victory and win the T20I series 4⃣-1⃣ 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/AwZfWUTBGi#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/SktrGoq0Dp
— BCCI (@BCCI) January 31, 2026
अर्शदीप सिंगच्या वेगापुढे किवींचे लोटांगण –
अर्शदीप सिंग ५ विकेट्सचा पराक्रम
प्रत्युत्तरात २७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात वादळी झाली होती. फिन ॲलनने ३८ चेंडूंत ८० धावांची खेळी करत भारतीयांची धाकधूक वाढवली होती. रचिन रवींद्र (३० धावा) आणि फिन ॲलन यांनी १०० धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर अर्शदीप सिंग नावाचं वादळ आलं. ज्याने भेदक गोलंदाजी करताना ४ षटकांत न्यूझीलंडच्या ५ फलंदाजांना तंबूत धाडून आपला ‘पंजा’ (५ विकेट्स) खोलला. यादरम्यान अक्षर पटेलने ३ विकेट्स घेत अर्शदीप सिंगला मोलाची साथ दिली. न्यूझीलंडचा संघ १९.४ षटकांत २२५ धावांवर गारद झाला. ज्यामुळे भारताने ४६ धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केला.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया सज्ज!
या विजयामुळे भारताने मालिका खिशात घातली असून खेळाडूंच्या जबरदस्त फॉर्ममुळे निवड समितीची डोकेदुखी वाढली आहे. अभिषेक शर्माचे षटकार, इशानचे शतक आणि अर्शदीपची अचूक गोलंदाजी या मालिकेची मुख्य वैशिष्ट्ये ठरली.





