IND vs NZ Final : टीम इंडियाने विजयाच्या गुलालासह रचला नवा इतिहास! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर कोरलं नाव
IND vs NZ Final : विवारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विक्रमी तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.

IND vs NZ Final India win 3rd T20 World Cup :टी-२० विश्वचषक २०२६ च्या महाअंतिम सामन्यात भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरणार पहिला संघ ठरला. भारताने दिलेले २५६ धावांचे विशाल लक्ष्य गाठताना किवी संघाचा डाव १५९ धावांत आटोपला. या विजयासह भारतीय संघ स्वतःचे जेतेपद यशस्वीरीत्या राखणारा (Defend) जगातील पहिला संघ ठरला आहे, तसेच घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकणाराही भारत पहिलाच यजमान देश बनला आहे.
२०२३ च्या जखमांवर विजयाची फुंकर
१९ नोव्हेंबर २०२३ रोजी याच मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचे शल्य प्रत्येक भारतीयाच्या मनात होते. त्यामुळे ८ मार्च रोजी जेव्हा भारत पुन्हा एकदा अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा चाहत्यांच्या मनात धाकधूक होती. मात्र, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने भूतकाळ विसरून नव्या जिद्दीने खेळत इतिहास रचला. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने ९८ धावांची वादळी सलामी दिली.
𝐂.𝐇.𝐀.𝐌.𝐏.𝐈.𝐎.𝐍.𝐒 🇮🇳#TeamIndia clinch a record 3️⃣rd ICC Men’s #T20WorldCup title 🏆
Take. A. Bow 🫡#MenInBlue | #Final | #INDvNZ pic.twitter.com/nml1AZY5tK
— BCCI (@BCCI) March 8, 2026
संजू-अभिषेकने पहिल्या विकेटसाठी साकारली ऐतिहासिक भागीदारी –
अभिषेक शर्माने २१ चेंडूत ५२ धावांचे वेगवान अर्धशतक ठोकले, तर संजू सॅमसनने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यानंतर इशान किशनने देखील २५ चेंडूत ५४ धावा कुटत भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले. कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यात स्वस्तात बाद झाला असला, तरी अखेरच्या षटकांत शिवम दुबेने अवघ्या ८ चेंडूत २६ धावा चोपल्या, तर हार्दिक पांड्याने १८ धावांचे योगदान दिले. भारताने निर्धारित २० षटकात ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला, जी टी-२० विश्वचषक फायनलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
What a breathtaking night for #TeamIndia and the entire nation 🇮🇳
The #MenInBlue win by 9️⃣6️⃣ runs to defend the ICC Men’s #T20WorldCup title 🏆#Final | #INDvNZ pic.twitter.com/N6gPRBW0Ri
— BCCI (@BCCI) March 8, 2026
न्यूझीलंडचा निम्मा संघ ७२ धावांतच तंबूत परतला –
प्रत्युत्तरात २५६ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली विखुरला गेला. टिम सायफर्ट आणि फिन अॅलन यांनी ३१ धावांची सलामी दिली, परंतु पहिला गडी बाद झाल्यानंतर किवी संघाची फलंदाजी पत्त्यांसारखी कोसळली. केवळ ७२ धावांवर त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला होते. न्यूझीलंडकडून टिम सायफर्टने सर्वाधिक ५२ धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सँटनरने ४३ धावांचे योगदान दिले, मात्र इतर सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत न्यूझीलंडचा डाव १५९ धावांत रोखला.
बुमराह-अक्षरची भेदक गोलंदाजी –
भारताच्या या ऐतिहासिक विजयात जसप्रीत बुमराहने ४ विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली, तर अक्षर पटेलने ३ गडी बाद करत त्याला उत्तम साथ दिली. अशा प्रकारे, फलंदाजांच्या विक्रमी धावसंख्येमुळे आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे भारताने ९६ धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली आहे.





