IND vs NZ 1st Test : शून्यावर बाद होऊनही कोहलीने नोंदवला विक्रम, ‘या’बाबतीत धोनीला टाकले मागे….

IND vs NZ 1st Test (Virat Kohli) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. पावसामुळे पहिला दिवस नाणेफेकीविना रद्द झाला. यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला. यासह भारताच्या नावावर लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे. घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली.
दरम्यान, टीम इंडियाचा सीनियर फलंदाज विराट कोहली गुरुवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात शून्यावर बाद झाला असला तरी या सामन्यासाठी विराट मैदानात उतरताच त्याने माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकत त्याचा एक मोठा विक्रम मोडित काढला.
वास्तविक, या सामन्यापूर्वी एमएस धोनी भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या बाबतीत 535 सामन्यासह दुसऱ्या क्रमांकावर होता, मात्र आता विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आला असून एमएस धोनी तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळून सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे.
गुरुवारी मैदानात उतरताच विराट कोहलीने आपला 536 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि धोनीला मागे पिछाडीवर टाकले. कोहलीने भारतासाठी आतापर्यंत 295 एकदिवसीय, 125 टी-20 आणि 116 कसोटी सामने खेळले आहेत. अलीकडेच त्याने टी-20 फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेतली आहे.





