#INDvsNED । सामन्याअगोदरच नेदरलॅंड्सच्या कॅप्टनला वाटतेय विराटची भीती, म्हणाला…

T20 WorldCup 2022 – टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघाचा दुसरा सामना २७ ऑक्टोबर रोजी नेदरलॅंड्स संघाविरुद्ध खेळला जाणार आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा रोमहर्षक सामन्यात ४ गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ गुणतालिकेतील नेट रनरेटचा विचार करून आक्रमक खेळ करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नेदरलॅंड्स संघाला या सामन्यात मोठा संघर्ष करावा लागणार आहे. याव्यतिरिक्त दमदार लयीत असलेल्या विराट कोहलीचे आव्हान विरोधी संघाला झेपणार की नाही, हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
शोएब अख्तर म्हणतोय, “विराट तू टी-२० क्रिकेटमधून सन्यास घे…”
नेदरलॅंड्स संघाने पात्रता फेरीत चांगले प्रदर्शन केलेले आहे. त्यामुळे ते या सामन्यात भारतीय संघाला टक्कर देणार हे निश्चित आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने म्हटले की, मला वाटत नाही की या सामन्यात मोठ्या प्रमाणात लोक आमच्याकडून जिंकण्याची अपेक्षा करत आहेत, तरीदेखील आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करू.”
पुढे बोलताना एडवर्ड्स म्हणाला की, “प्रत्येक संघाचे स्वप्न असते त्यांनी या विश्वचषक स्पर्धेत खेळावे, कारण ही खूप मोठी स्पर्ध असून यामध्ये आव्हानेही मोठीच असतात. भारताच्या विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध दमदार खेळी केली आहे. मात्र मला खात्री आहे की, विराट पाकिस्तानविरुद्धच्या खेळीची या सामन्यात पुनरावृत्ती करणार नाही.” असे म्हणत एडवर्ड्सने विराटचे कौतुकही केले आणि मजेशीर टिप्पणीही केली.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील विराट कोहलीची खेळी संपूर्ण जगाने पहिली आहे. या सामन्यात अत्यंत दबाव असतानाही सयंमाने आणि उत्तम रणनीतीने फलंदाजी करण्याच कौशल्य विराटने दाखवून दिलं. पाकिस्तानच्या १६० धावांच्या लक्ष्यासमोर भारतीय संघ सुरुवातीला ३० धावांत ४ बाद अशा स्थितीत होता. मात्र यानंतर विराटच्या ५२ चेंडूत ८२ धावांच्या बळावर संपूर्ण भारतवासीयांनी दिवाळीच्या एक दिवस अगोदरच फटाक्यांची आतिषबाजी केली.
या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. युवा अर्शदिप सिंगने त्यांच्या वेगवान माऱ्याने पाकिस्तानच्या फलंदाजांना बाद केले. त्याचबरोबर हार्दिक पंड्याने संघासाठी अष्टपैलू कामगिरी केली. त्याने फलंदाजीत विराटसोबत संघ अडचणीत असताना चांगली भागीदारी केली. भारताने पाकिस्तानला ४ गडी राखून पराभूत केले आणि पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.





