नवी दिल्ली – आयसीसीच्या ताज्या ट्वेंटी-20 क्रिकेटमधील क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मोठी झेप घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वी ट्वेंटी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत 35 व्या क्रमांकावर असलेला विराट आज 9 व्या क्रमांकावर आला आहे. सध्या चालू असलेल्या टी-20 विश्वकरंडकातील भारत वि. पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याआधी विराट 15 व्या क्रमांकावर होता, परंतु पाकविरूध्दच्या त्याच्या नाबाद 82 धावांच्या अविश्वसनीय खेळीने सारे चित्र बदलले.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा अव्वल फलंदाजांमध्ये सामील झाला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत विराटला पाच स्थानांचा फायदा झाला आहे. विराट आता नवव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवची मात्र एका स्थानाने घसरण झाली आहे. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दमदार खेळीच्या जोरावर थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 849 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.
विराटने पाकिस्तानविरुद्ध 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सहा चौकार आणि चार षटकार मारले. विराटच्या या दमदार खेळीमुळे भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. आयसीसी क्रमवारीत या खेळीचा फायदा कोहलीला झाला असून तो टॉप-10 फलंदाजांमध्ये परतला आहे. त्याचवेळी या सामन्यात सूर्यकुमार यादव अपयशी ठरला होता. त्याने 10 चेंडूत 15 धावा केल्या होत्या आणि आता तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 92 धावांची खेळी करून न्यूझीलंडला विजय मिळवून देणाऱ्या डेव्हॉन कॉनवेला तीन स्थानांचा फायदा झाला असून तो दुसऱ्या स्थानावर आहे. कॉनवेला रिझवानच्या जागी टी-२०चा अव्वल फलंदाज बनण्याची संधी आहे. कॉनवेचे 831 रेटिंग गुण आहेत, तर पहिल्या क्रमांकावर असलेल्यामोहम्मद रिझवानचे 849 रेटिंग गुण आहेत. फिन ऍलनच्या साथीने कॉनवेने न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली आणि त्यामुळे न्यूझीलंडचा संघ यजमान ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यशस्वी ठरला.
कॉनवेने भारताच्या सूर्यकुमार यादव, पाकिस्तानचा बाबर आझम आणि दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामला मागे टाकले आहे. आता तो मोहम्मद रिझवानसमोर आव्हान उभे करत आहे. न्यूझीलंडच्या फिन ऍलननेही 17 स्थानांची प्रगती केली असून तो 13 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा 16व्या व लोकेश राहुल 18 व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार दहाव्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटची टॉप टेनमध्ये एट्री झाली असून त्याचा हा फॉर्म असाच कायम राहिला तर तो टॉप फाईव्हमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान व बाबर आजम यांनाही टक्कर देऊ शकतो.