IND vs ENG Test Series 2024 : विराट कोहलीकडे अनेक विक्रम करण्याची संधी…

India vs England Test Series 2024 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडचे आव्हान भारतासमोर आहे. या मालिकेदरम्यान सर्वांच्या नजरा विराट कोहलीवरही असणार आहेत. कोहलीने इंग्लंडविरुद्ध नेहमीच चमकदार कामगिरी केली आहे आणि तो पुन्हा एकदा टीम इंडियासाठी संस्मरणीय फलंदाजीची कामगिरी करू इच्छितो.
विराटने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 28 कसोटीत 42.36 च्या सरासरीने 1 हजार 991 धावा केल्या आहेत. त्याला आता इंग्लंडविरुद्ध कसोटीत दोन हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. भारताकडून सचिनने 32 कसोटीत 2 हजार 535 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गावसकरच्या नावावर 38 कसोटीत 2 हजार526 धावा आहेत.
विराटने आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाच शतके झळकावली आहेत. आगामी मालिकेत त्याने आणखी दोन शतके ठोकल्यास तो सचिन तेंडुलकर आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी बरोबरी करू शकतो. तेंडुलकर आणि द्रविड यांची प्रत्येकी सात शतके आहेत. चेतेश्वर पुजारा आणि दिलीप वेंगसरकर यांनी प्रत्येकी पाच शतके झळकावली आहेत.
कोहलीने आतापर्यंत भारताकडून कसोटीत 8848 धावा केल्या आहेत. त्याने 152 धावा केल्या तर तो कसोटीत नऊ हजार धावा पूर्ण करेल. त्याच्या आधी सचिन (15,921 धावा), द्रविड (13,288 धावा) आणि गावसकर (10,122 धावा) यांनी भारतासाठी ही कामगिरी केली आहे.
IND vs ENG Test Series 2024 : बॅझबॉल स्वीकारल्यापासून इंग्लंड अपराजित – नासिर हुसेन
विराटला या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांनाही मागे टाकण्याची संधी असेल. कोहलीच्या नावावर कसोटीत 29 शतके आहेत. ब्रॅडमन आणि विल्यमसन यांच्या नावेही प्रत्येकी 29 शतके आहेत. विराटने शतक ठोकल्यास तो ब्रॅडमन आणि विल्यमसनला मागे टाकेल.





