लंडन – भारताविरुद्धची इंग्लंडची आगामी कसोटी मालिका कमालीची चुरशीची होईल, असे सांगून इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन म्हणाला की, भारताला भारतात हरवणे अवघड असले तरी बॅझबॉल स्वीकारल्यापासून इंग्लंड अपराजित आहे. तरिही भारत २०१२-२३ पासून मायदेशात अपराजित आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
एका खासगी वाहिनीशी बोलताना हुसेन म्हणाला की, या मालिकेत विजयाची पहिली संधी भारताला आहे, हे नक्की. शिवाय सध्या ते कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थानवर आहेत. इंग्लंडने बॅझबॉल वापरायला सुरुवात केल्यापासून प्रत्येक आव्हानाला तोंड दिले आहे. त्यांचा बेन स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्युलमची कामगिरीही लक्षणीय झाली आहे. बॅझबॉल खूप यशस्वी झाला आहे, विशेषत: मायदेशात. आता भारत किंवा ऑस्ट्रेलियामध्ये तशीच कामगिरी नोंदवणे हे इंग्लंडसाठी मोठे आव्हान राहील.
बॅझबॉल म्हणजे काय…?
क्रिकेटमध्ये ड्यूक्स, एसजी, कुकाबुरा असे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू वापरले जातात. आता बॅझबॉल हा कुठला नवा चेंडू असा विचार तुमच्या मनात येणं साहजिक आहे. पण हा चेंडू नाहीये तर हा खेळण्याचा नवा पवित्रा (शैली) आहे. इंग्लंड क्रिकेट संघाने अंगीकारलेला हा पवित्रा म्हणजे बॅझबॉल होय.
न्यूझीलंडचे माजी यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडचे टेस्ट संघाचे प्रशिक्षक आहेत. धडाकेबाज आणि अनोख्या फलंदाजीच्या शैलीसाठी मॅक्युलम ओळखले जायचे. मॅक्युलम यांचं टोपणनाव ‘बॅझ’ असं आहे. मॅक्युलम यांनी इंग्लंड संघाच्या मार्गक्रमणासाठी आखलेली योजना म्हणजे बॅझबॉल होय.