Ind Vs ENG Test: शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर; कोहली पुन्हा घेणार ब्रेक

Ind Vs ENG Test : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे. या संघामध्ये आघाडीचा फलंदाज विराट कोहली, श्रेय्यस अय्यरला वगळण्यात आले आहे. तर रविंद्र जडेजा आणि के. एल राहुल यांनी पुन्हा एकदा संघात पुनरागमन केले आहे.
विराट कोहली उर्वरित तीन सामन्यांसाठीही खेळणार नाही. वैयक्तिक कारणांमुळे विराट उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. तर स्टार फलंदाज श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या गेल्या तीन कसोटी सामन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. दुखापतीमुळे त्याला भारतीय निवड समितीने विश्रांती दिली आहे. भारतीय निवड समितीने यासाठी 17 खेळाडूंची निवड केली आहे.
रोहित शर्माची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांचे संघात पुनरागमन झाले आहे, परंतु वैद्यकीय संघाकडून फिटनेस मंजुरीनंतरच त्यांचा सहभाग घेता येणार आहे. म्हणजे जडेजा आणि राहुल संघात परतले असले तरी ते खेळतील हे निश्चित नाही.
🚨 NEWS 🚨#TeamIndia‘s Squad for final three Tests against England announced.
Details 🔽 #INDvENG | @IDFCFIRSTBankhttps://t.co/JPXnyD4WBK
— BCCI (@BCCI) February 10, 2024
वेगवान गोलंदाज आवेश खानला संघात स्थान मिळालेले नाही. निवड समितीने शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज आकाश दीपची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. आवेशसाठी रणजी करंडक खेळणे चांगले होईल, असे निवडकर्त्यांचे मत आहे. इंग्लंड लायन्सविरुद्ध आकाशने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ते पाहून निवड समिती आणि भारतीय कर्णधार रोहित खूपच प्रभावित झाले. मोहम्मद सिराजचेही संघात पुनरागमन झाले असून त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती.
उर्वरीत सामना कधी आणि कुठे होणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. हा सामना राजकोटमध्ये होणार आहे. यानंतर चौथा सामना रांचीमध्ये होणार आहे. मालिकेतील हा चौथा सामना २३ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना ७ मार्चपासून खेळवला जाणार आहे. हा सामना धर्मशाला येथे होणार आहे.
शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (डब्ल्यूके), केएस भरत (डब्ल्यूके) , आर अश्विन, रवींद्र जडेजा*, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव.





